विद्याधर अनास्कर यांच्या तीन खंडांतून बँकिंग साक्षरतेचा ३८ वर्षांचा प्रवास
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : बँकिंग क्षेत्राचे गाढे अभ्यासक आणि राज्य सहकारी बँकेचे विद्यमान प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘बँकांविषयी सर्वकाही’ या पुस्तकाच्या तीन भागांचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २९ सप्टेंबर रोजी मुंबईत झाले. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध वर्तमानपत्रांमधून वाचकांनी विचारलेल्या बँकिंगविषयक प्रश्नांना अनास्कर यांनी दिलेल्या निवडक प्रश्नोत्तरांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. पुण्याच्या राजहंस प्रकाशनाने हे तीन खंड प्रकाशित केले आहेत.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनास्कर यांच्या गेल्या ३८ वर्षांपासून सुरू असलेल्या बँकिंग साक्षरतेच्या कार्याचे कौतुक केले. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात बँकिंग हा अविभाज्य भाग बनला असून, कष्टाने कमावलेल्या पैशाची सुरक्षितता आणि योग्य आर्थिक व्यवहारांसाठी प्रत्येकाला बँकिंगचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अनास्कर यांच्या सामाजिक उपक्रमाला आणि पुढील वाटचालीला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
‘बँकांविषयी सर्वकाही’मध्ये बँकिंगची कार्यप्रणाली, रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्त्वे, सहकारी बँकिंगसंदर्भातील कायदे व नियम, सहकार विभागाची परिपत्रके, आदर्श उपविधी तसेच विविध न्यायालयांच्या महत्त्वपूर्ण निकालांचा सोप्या आणि बोली भाषेतील संदर्भ देण्यात आला आहे.
विशेषतः कर्जदार, जामीनदार आणि ठेवीदारांच्या मनातील प्रश्नांना स्पष्ट उत्तरे या पुस्तकातून मिळतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरक्षित आणि सजग बँकिंगचे मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ उपयुक्त ठरणार आहे. ‘सहकार हीच माझी साधना’ हा विचार आयुष्यभर जपत अनास्कर यांनी बँकिंग साक्षरतेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत आर्थिक ज्ञान पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे.


