‘शिवाजी पार्क आंदोलन जंतर-मंतरच्या कारस्थानाचा भाग’
आंदोलकांच्या भूमिकेवर राणेंचा निशाणा
आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी माफी आणि कायदेशीर कारवाईची मागणी
मुंबई : शिवाजी पार्क येथे प्रस्तावित आंदोलनावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आंदोलनाच्या आयोजकांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवाजी पार्कमधील प्रस्तावित आंदोलन हे दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या पुढील भागासारखे असून, आंदोलनाच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राणे यांनी केला. “शिवरायांचा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी सांगितले की, त्यांचा विरोध कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला नसून देशविरोधी आणि संविधानविरोधी अजेंड्याला आहे. सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या एका ग्राफिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची आक्षेपार्ह पद्धतीने तुलना करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांचा अशा प्रकारे अवमान महाराष्ट्र आणि देश कधीही स्वीकारणार नाही, असे राणे म्हणाले.
ठाकरे बंधूंवरही निशाणा
या मुद्द्यावरून राणे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या ठाकरे बंधूंनी शिवरायांचा तसेच हिंदू देवी-देवतांचा अवमान करणाऱ्या घटकांवर कारवाईची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “बाळासाहेबांच्या विचारांचा त्याग करून हे लोक तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्यांच्या मागे उभे राहत आहेत,” असा आरोप राणे यांनी केला. आमच्यासाठी पक्ष आणि पदापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि आमची अस्मिता सर्वोच्च आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाच्या अधिकाराला विरोध नाही
लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. मात्र आंदोलनाच्या माध्यमातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा प्रयत्न झाल्यास प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. विरोधकांकडून करण्यात येणारे ‘व्होट चोरी’चे आरोप हे स्वतःचे अपयश झाकण्यासाठी सुरू असलेले वितंडवाद असल्याची टीकाही राणे यांनी केली.
दोन प्रमुख मागण्या
संबंधित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टप्रकरणी आयोजक अभिजित दिपके यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, तसेच मुंबई पोलिसांनी या पोस्टची आणि प्रस्तावित आंदोलनाची गंभीर दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राणे यांनी केली. शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा प्रश्न महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडलेला असल्याचे सांगत, त्यांच्या अवमानाच्या कोणत्याही प्रकाराला विरोध केला जाईल, अशी ठाम भूमिका नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.