स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : आयआयटी बॉम्बेचे विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आई-वडिलांनी न्यायाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला ऑल इंडिया उलेमा बोर्डाने ठाम पाठिंबा दर्शविला आहे.
ऑल इंडिया उलेमा बोर्डचे महाराष्ट्र –गोवा कोअर कमिटीचे प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी साहिल वाकोडे यांच्या वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या कुटुंबीयांप्रती एकजुटीची भूमिका व्यक्त केली. न्यायाच्या या लढ्यात बोर्ड कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आझाद मैदानात सुरू असलेल्या उपोषणाला विविध सामाजिक संस्था, नेते, कार्यकर्ते आणि संघटनांकडून पाठिंबा व्यक्त केला जात आहे. साहिल वाकोडे यांच्यासोबत नेमके काय घडले, या प्रकरणाची वस्तुस्थिती काय आहे आणि त्यासाठी जबाबदारी कोणाची आहे, याचा निष्पक्ष, पारदर्शक आणि कायद्यानुसार तपास होऊन सत्य समोर यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
साहिल यांच्या कुटुंबीयांचा संघर्ष शांततामय आणि संविधानिक मार्गाने सुरू असून, त्यांच्या मागण्यांकडे शासन व संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असे हाजी शाहनवाज खान यांनी म्हटले आहे.
साहिल वाकोडे यांच्या आई-वडिलांच्या न्यायाच्या मागणीसोबत ऑल इंडिया उलेमा बोर्ड ठामपणे उभे आहे. त्यांच्या न्यायाच्या लढ्यात शेवटपर्यंत साथ देऊ,” अशी भूमिका हाजी शाहनवाज खान यांनी व्यक्त केली.

