नवी मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली असून पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि दैनंदिन गरजांसाठी ग्रामीण जनतेची मोठी परवड होत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नवी मुंबई युवा सेनेचे जिल्हा सरचिटणिस निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दुष्काळाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसत नसून कष्टकरी, ग्रामीण जनता आणि मुक्या जनावरांनाही त्याची झळ सोसावी लागत आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत असून चाऱ्याअभावी पशुधन संकटात सापडले आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे मांडवे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
नवी मुंबईच्या उभारणीत संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आहे. त्यामुळे संकटाच्या काळात नवी मुंबईने ग्रामीण महाराष्ट्राच्या पाठीशी उभे राहणे ही सामाजिक बांधिलकी आहे, अशी भूमिका निखिल मांडवे यांनी मांडली आहे.
महापालिकेने आपल्या उपलब्ध तरतुदींच्या माध्यमातून दुष्काळ निवारणासाठी तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थिक मदत, तीव्र टंचाईग्रस्त भागातील निवडक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणे, पशुधनासाठी चारा छावण्यांना किंवा संबंधित उपाययोजनांना विशेष मदत करणे, तसेच दुष्काळग्रस्त भागात साथीचे आजार रोखण्यासाठी फिरती वैद्यकीय पथके आणि औषधसाठा उपलब्ध करून देणे, या उपाययोजनांचा समावेश आहे.
“दुष्काळग्रस्तांच्या वेदना केवळ बातम्यांमधून पाहण्याची वेळ नसून त्यांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची गरज आहे. नवी मुंबई सक्षम महापालिका आहे; त्यामुळे महाराष्ट्रातील संकटग्रस्त बांधवांसाठी तिने मदतीचा आदर्श निर्माण करावा,” अशी भावना निखिल मांडवे यांनी व्यक्त केली.
दुष्काळग्रस्त भागातील परिस्थितीची तातडीने दखल घेऊन प्रशासकीय पातळीवर आवश्यक निर्णय घ्यावेत आणि शासनाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करून प्रत्यक्ष मदत पोहोचवावी, अशी आग्रही मागणी मांडवे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
“नवी मुंबईचा विकास महाराष्ट्राच्या योगदानातून झाला; आता महाराष्ट्राच्या संकटात नवी मुंबईने योगदान देण्याची वेळ आली आहे,” असा संदेश या निवेदनातून निखिल मांडवे यांनी दिला आहे.


