नेरूळ सेक्टर ८ मधील शाहू महाराज उद्यानाखालील प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याची निखिल मांडवे यांची मागणी; सारसोळे बस डेपोचा पर्याय सुचविला
वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : पुनर्विकासानंतर नेरूळ सेक्टर ८ आणि सेक्टर १० परिसरात सोसायट्यांच्या अंतर्गतच हजारो वाहनांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता असताना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानाखाली कोट्यवधी रुपये खर्चून भूमिगत वाहनतळ उभारण्याचा अट्टहास कशासाठी? भविष्यात सुमारे तीन हजार वाहनांच्या पार्किंगची सोय निर्माण होणार असेल, तर जनतेच्या कररूपी पैशांची उधळपट्टी कशासाठी, असा थेट सवाल युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस निखिल मांडवे यांनी उपस्थित केला आहे. नेरूळ सेक्टर ८ मधील प्रस्तावित भूमिगत वाहनतळ प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विकासाच्या नावाखाली उद्यानाचे नुकसान कशासाठी?
नेरूळ सेक्टर ८ मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानाचा महापालिकेने अलीकडेच विकास आणि सुशोभीकरण केले आहे. उद्यानात लहान मुलांची खेळणी, योगा शेड, आधुनिक स्वच्छतागृह, ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक आणि संरक्षण भिंत यांसारख्या सुविधा आहेत. अनेक जुनी, सावली देणारी झाडेही या उद्यानात आहेत. अशा वेळी उद्यानाखाली खोदकाम करून भूमिगत वाहनतळ उभारल्यास आधीच्या विकासकामांवर झालेला खर्च वाया जाण्याची आणि पर्यावरणाची हानी होण्याची भीती मांडवे यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांसाठी विकसित केलेल्या उद्यानाचे जतन करण्याऐवजी पुन्हा कोट्यवधींचा खर्च करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला आहे.
पुनर्विकासातून हजारो वाहनांची पार्किंग; तरीही नव्या प्रकल्पाचा घाट?
मांडवे यांच्या निवेदनानुसार, सेक्टर ८ आणि सेक्टर १० च्या काही भागांत सध्या सुमारे २,३०० घरे आहेत. पुनर्विकासानंतर घरांची संख्या वाढणार असून, विकासकांना नियमानुसार पार्किंगची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. त्यामुळे भविष्यात सोसायट्यांच्या आवारातच २,५०० हून अधिक वाहनांची पार्किंग उपलब्ध होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. परिसरातील व्यावसायिक संकुलांमध्येही पार्किंगची व्यवस्था विकसित होऊ शकते. या संभाव्य क्षमतेचा विचार करता, एकीकडे खासगी सोसायट्यांमध्ये पार्किंग वाढणार आणि दुसरीकडे उद्यानाखाली स्वतंत्र वाहनतळ उभारण्यासाठी महापालिका मोठी रक्कम खर्च करणार, हा विरोधाभास तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रस्त्यांची क्षमता आणि बेलापूरचा अनुभव तपासा
परिसरातील १५ ते १८ मीटर रुंदीच्या रस्त्यांचे योग्य नियोजन केल्यास पार्किंगची गरज काही प्रमाणात भागवता येऊ शकते, असा दावा मांडवे यांनी केला आहे. तसेच, सीबीडी बेलापूर येथील बहुमजली वाहनतळाच्या वापराबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेण्यापूर्वी प्रत्यक्ष वाहनांची संख्या, भविष्यातील मागणी, वाहतुकीवरील परिणाम, बांधकामाचा खर्च आणि दीर्घकालीन देखभाल खर्च यांचा पारदर्शक अभ्यास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सारसोळे बस डेपोचा पर्याय; महसुलातून खर्च वसुलीची सूचना
महापालिकेला भविष्यात मोठ्या वाहनतळाची गरज भासत असेल, तर सारसोळे बस डेपो येथे बहुमजली इमारत उभारण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशी सूचना मांडवे यांनी केली आहे. या प्रकल्पात तळमजल्यावर बस डेपो, वरच्या मजल्यांवर वाहनतळ आणि व्यावसायिक गाळ्यांची व्यवस्था करता येईल. गाळे दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने देऊन महापालिकेला महसूल मिळवता येऊ शकतो, असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.
भूमिगत पार्किंग रद्द करा, उद्यान वाचवा!
राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानातील प्रस्तावित भूमिगत वाहनतळ प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, उद्यानाची आणि पर्यावरणाची हानी टाळावी तसेच पर्यायी वाहनतळासाठी सारसोळे बस डेपोचा विचार करावा, अशा मागण्या निखिल मांडवे यांनी केल्या आहेत. भविष्यातील पार्किंगची गरज आणि उपलब्ध होणारी क्षमता यांचा वस्तुनिष्ठ अभ्यास न करता जनतेचा पैसा मोठ्या प्रकल्पात गुंतवणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आयुक्तांनी या प्रस्तावाचा फेरविचार करून करदात्यांच्या पैशांचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

