नवी मुंबईत महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेचा शिवमय जागर!
खुल्या गटासाठी ३० हजार, तर शालेय गटासाठी २० हजारांचे प्रथम पारितोषिक
१० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी
स्वयंम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : दिवाळी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले हे अतूट नाते अधिक दृढ करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धा २०२६-२७’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून नवी मुंबईतील शाळा, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, स्वराज्याची प्रेरणा आणि महाराष्ट्राची दुर्गपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, तसेच गड-किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून शालेय आणि खुला अशा दोन गटांत ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धकांना ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याची संधी मिळणार असून किल्ल्यांची रचना, ऐतिहासिक संदर्भ, कल्पकता आणि सादरीकरण या निकषांवर त्यांच्या कलाकृतींचे मूल्यमापन केले जाणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. खुल्या गटात प्रथम क्रमांकासाठी ३० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये देण्यात येणार आहेत. शालेय गटात प्रथम क्रमांकासाठी २० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय दोन्ही गटांत प्रत्येकी तीन उत्तेजनार्थ पारितोषिके पाच हजार रुपये याप्रमाणे देण्यात येणार आहेत.
इच्छुक स्पर्धकांनी १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. नोंदणीसाठी येथे क्लिक करा किंवा स्पर्धेच्या पोस्टरवरील क्यूआर कोड स्कॅन करून गुगल फॉर्म भरावा. अधिक माहितीसाठी ९१३६०३७२२५ किंवा ९८६९५५५२२० या क्रमांकांवर संपर्क साधावा.
महापौर सुजाता सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश कान्हा म्हात्रे, उपसभापती राजू भालचंद्र मढवी आणि समितीच्या सदस्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
दिवाळीत किल्ले बांधण्याची परंपरा जपत इतिहास, संस्कृती आणि स्वराज्याच्या पराक्रमाचा जागर करण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील शाळा, विद्यार्थी, युवक, संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे सभापती गिरीश कान्हा म्हात्रे यांनी केले आहे.
गड-किल्ले घडवूया, इतिहास जपूया! या संकल्पनेतून आयोजित ही स्पर्धा नव्या पिढीमध्ये शिवइतिहासाची आवड निर्माण करणारा उपक्रम ठरणार आहे.