अमोल क्षीरसागर
नवी मुंबई : पोलीस ठाण्यात तुम्ही तक्रार घेवून गेलात अथवा काही कामानिमित्त गेलात तर काय पाहताय, चक्क ठाण्यात असलेल्या दोन महिला एकामागोमाग खुर्ची टाकून ‘झी टॉकीज’ या चॅनलवर दुपारी सुरू असलेला ‘गाढवाचं लग्न’ हा चित्रपट मन लावून पाहतायं. त्याच्या बाजूच्याच खुर्चीवर दुसरा पोलीसदेखील मन लावून हाच सिनेमा पाहतोय. हे दृश्य यूपी-बिहारमधल्या पोलीस ठाण्यातले नसून २१व्या शतकाचे प्रतिनिधीत्व करणार्या नवी मुंबई शहरातील सानपाडा पोलीस ठाण्यात दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान पहावयास मिळाले. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यात लोकांची वर्दळ सुरू असतानाही महिला व पुरूष पोलीस कर्मचारी ‘गाढवाचं लग्न’ चित्रपटाचा आस्वाद घेतच होते.
सानपाडा परिसर पूर्वी तुर्भे पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत होता. काही महिन्यापूर्वी सानपाडा सेक्टर आठ परिसरात पेट्रोलपंपाच्या विरूध्द दिशेला हुतात्मा बाबू गेनू मैदानातच जागृत गणेश मंदीराच्या पाठीमागील बाजूस सानपाडा पोलीस ठाणे नव्याने निर्माण करण्यात आले. या पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.११ मार्च) दुपारी रहीवाशांची वर्दळ सुरू असतानाही महिला व पोलीस कर्मचारी बिनधास्तपणे ‘झी टॉकीज’ या वाहिनीवरील ‘गाढवाचं लग्न’ या विनोदी चित्रपटाचा आस्वाद घेताना पहावयास मिळाले. महिला पोलीस कर्मचारी तर चित्रपट थिएटरमध्ये बसल्याप्रमाणे एकामागोमाग खुर्ची टाकून सिनेमा पाहत बसलेले पहावयास मिळाले. सानपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर पाटील यांनी सानपाडा पोलीस ठाण्यात एक रंगीत टिव्ही भेट दिला होता. या टिव्हीवर बातम्या सोडून विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सतत सुरू असल्याचे व पोलीस त्याचा आस्वाद घेत असल्याची माहिती सानपाडावासियांकडून दिली जात आहे. विशेष म्हणजे सानपाडा पोलीस ठाण्यातील महिला कर्मचार्यांचा जागतिक महिला दिनी एका सामाजिक संस्थेकडून गौरवही करण्यात आला होता. कामावर असताना टीव्ही सुरू असलेला सिनेमा पाहण्याच्या कामासाठीच त्यांना गौरविण्यात आले होते का, असा प्रश्न सानपाडावासियांकडून विचारला जात आहे.
नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी अथवा पोलीस उपायुक्तांनी सानपाडा पोलीस ठाण्याला साध्या वेशामध्ये भेट दिल्यास पोलीस ठाण्याचे सिनेमागृहात रूपांतर झाल्याचे व पोलीसदेखील प्रेक्षक झाल्याचे त्यांना पहावयास मिळाले. पोलीस ठाण्यात सतत सुरू असलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाविषयी सानपाडावासियांकडून संतप्त सूर आळविला जात आहे.