योगेश शेटे
नवी मुंबई : नवी मुंबई आरटीओ कार्यालयात नागरिकांना आलेला वाईट अनुभव आणि होणारा खर्च व वेळ टाळण्यासाठी अनेकजण कार्यालयाच्या आवारातील एजंटची मदत घेताना दिसत आहेत. कधीही रांगेत उभे न राहता मागच्या दरवाजाने काम करून घेणारे येथील एजंट नागरिकांची बिनधास्तपणे लूट करीत असल्याची बाब समोर येत आहे.
आरटीओ कार्यालयाच्या परिसरात बसणार्या एजंटच्या माध्यमातून वाहन परवान्यासह इतर कामे नागरीक करीत असतात. टेबलाखालून होणारे इतर अनेक व्यवहार एजंटच्या माध्यमातून होत असल्याने त्यांची मग्रुरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एवढेच नव्हे तर काही एजंटच्या दादागिरीवरच या कार्यालयातील कामे होत असतात. अनेक अधिकार्यांच्या त्यांच्याशी असणार्या घनिष्ठ संबंधामुळे सर्वसामान्य नागरिकांपेक्षा एजंटची कामे त्वरित होत आहेत. सरकारी चौकटीत न बसणारी अनेक कामे एजंटच्या माध्यमातून केली जातात. लायसन्स काढण्यापासून ते वाहन ट्रान्सङ्गर करण्यापर्यंतची सर्व कामे त्यांच्या माध्यमातून केली जात आहेत. या कमाईत कार्यालयातील अधिकार्यांचा देखील समावेश असतो. एजंटकडून केल्या जाणार्या प्रत्येक कागदावर कोडवर्ड असतो. हा कोडवर्ड असेल तरच अधिकारी सही करतात. या माध्यमातून अधिकारी एजंटकडून टक्केवारी घेतात. साधे लायसन्स जरी काढायचे असेल, तर सहाशे रूपये अधिकचा खर्च येतो. हा खर्च न मानवणारा असला तरी कमी वेळेत आणि कुठल्याही अडथळ्याशिवाय काम करून घेण्यासाठी नागरिकांना नाईलाजास्तव एजंटकडूनच काम करून घ्यावे लागते आहे.
आरटीओ कार्यालयात ७५ ते १०० एजंट कार्यरत आहेत. हे सर्व एजंट लायसन्स काढण्यापासून इतर सर्व कामे करतात. त्याचप्रमाणे यात मोटारसायकलची पासिंग करणारे, कारची पासिंग करणारे, ओव्हरलोडसह आरटीओ अधिकार्यांनी पकडून आणलेल्या वाहनाची तोडजोड करणारे, अशी वेगवेगळ्या प्रकारची कामे वाटलेली असतात. यातील अनेक एजंटचे ग्राहक देखील ङ्गिक्स आहेत.