अमोल शीरसागर
नवी मुंबई :- महापालिका प्रभाग ७० मंजूर झालेल्या हायमस्टचे राजकारण करत शेजारच्या प्रभागातील एका नगरसेवकाने राजकारण करत आजवर रखडवल्याने नेरूळ पश्चिमेला त्या नगरसेवकाबाबत आणि त्याच्या पक्षाबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अधिकार्यांनी ‘ऑफ द् रेकॉर्ड’ चर्चा करताना मनसे, आप आणि कॉंगे्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर कबुली दिल्याने हायमस्ट रखडवण्याचे राजकारण करणार्यांच्या विरोधात आता घरटी प्रचार सुरू झाल्याने हायमस्टचे राजकारण नेरूळ पश्चिमेला कलाटणी देण्याचा विषय बनला आहे.
‘मेरी कमिजसे उसकी कमिज सफेद क्यू है’ अशी एका साबणाची व डिटर्जन्ट पावडरची जाहीरात टीव्ही वर करण्यात येत होती. पण नेरूळच्या राजकारणात माझ्या प्रभागात कामे होत नाही, माझ्या फाईलींना मंजुरी मिळत नाही आणि शेजारच्या प्रभागातील विरोधी पक्षाच्या नगरसेवकाच्या प्रभागात कामे कशी होतात, त्या नगरसेवकाच्याच फाईली मंजुर कशा होतात याबाबत इर्षेचे व सूडाचे राजकारण खेळत गेल्या काही दिवसापासून प्रभाग ७० मध्ये मंजूर झालेल्या व वर्क ऑर्डर मंजूर झालेल्या हायमस्टला पालिका अधिकार्यांवर दबाव टाकत रखडवण्यात शेजारच्या प्रभागातील नगरसेवकाला यश आले असले तरी त्या नगरसेवकाच्या पक्षाला हायमस्टचे राजकारण करण्याची करामत लोकसभा निवडणूकीत महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालिका प्रभाग ७० मधील शिवसेनेचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य रतन नामदेव मांडवे यांनी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून तसेच अधिकार्यांकडे चपला झिजवून प्रभागातील विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. शिवसेना नगरसेवक मांडवे यांच्या प्रभागातील होत असलेल्या विकासकामांबाबत त्या लगतच्या प्रभागातील एका नगरसेवकाला नेहमीच पोटदुखीचा विषय ठरला आहे. मांडवेंशी कामाच्या बाबतीत स्पर्धा होत नसल्याने तसेच मांडवेंच्या पाठीमागे असलेला जनसंपर्क तोडणे शक्य न झाल्याने संबंधित नगरसेवकाने पालिका प्रशासनातील विद्युत विभागातील अधिकार्यांवर दबाव टाकत मांडवेंच्या प्रभागात मंजूर झालेला ‘हायमस्ट’ रखडवण्याचे राजकारण केले.
शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या प्रभागात काही ठिकाणी हायमस्ट मंजूर करून वर्क ऑर्डरही काढण्यात यश मिळविले आहे. तथापि नेरूळ सेक्टर आठमधील गेहलोत बिल्डींगसमोरील रस्त्याच्या विरूध्द दिशेला संजीवनी हॉस्पिटलच्या समोरच एक हायमस्ट नगरसेवक मांडवेंच्या प्रयासातून बसविला जाणार होता. मांडवेंच्या हायमस्टला मंजूरी मिळूनही त्या हायमस्टची वर्क ऑर्डरही काढण्यात आली होती. तथापि आपण पाठविलेल्या ‘हायमस्ट’च्या फाईलला परवानगी मिळत नाही आणि मांडवेंच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी हायमस्ट बसविला जाणार असल्याचे समजताच शेजारील नगरसेवकाने हायमस्टचे राजकारण वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय करत हायमस्ट आजतागायत रखडवला आहे. पालिका प्रशासनातील विद्युतचे अधिकारीदेखील त्या नगरसेवकाच्या दबावतंत्राला बळी पडल्याने अद्यापि हायमस्ट बसविण्याच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही.
हायमस्टचे राजकारण कोणत्या थराला गेले आहे आणि कोणत्या नगरसेवकाने हे उद्योग सुरू केले आहेत, याबाबतची तपशीलवार माहिती पालिका प्रशासनातीलच अधिकार्यांनी ‘ऑफ द् रेकॉर्ड’ चर्चा करताना मनसे,आम आदमी पार्टी व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिल्याने नेरूळमधील राजकारणान कलाटणी घेतली असून आता घरटी हायमस्टच्या प्रचारास सुरूवात केली आहे. शिवसेना नगरसेवक रतन मांडवे यांचे सर्वपक्षीयांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने हायमस्ट प्रकरणी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून शेजारच्या नगरसेवकाने खालच्या पातळीवर केलेले राजकारण आता सर्वपक्षीय राजकारण्यांमध्ये संतापाचा विषय बनला आहे. नेरूळ सेक्टर ८,१०,६,२, १६,१८,२४ या परिसरात जुईनगरमध्ये रतन मांडवेंना मानणारा पश्चिम महाराष्ट्राचा मोठा जनसमुदाय असल्याने तसेच सारसोळे गाव आणि नेरूळ गावच्या ग्रामस्थांमध्ये मांडवेंची चांगलीच उठबस असल्याने हायमस्टच्या बाबतीत झालेले राजकारण आणि प्रशासनावर दबाव आणून रतन मांडवेंची केली जाणारी गळचेपी पश्चिम महाराष्ट्रातील जनतेसाठी व स्थानिक ग्रामस्थांसाठीही संतापाची बाब बनली आहे.
हायमस्टचे राजकारण करत शेजारच्या प्रभागातील नगरसेवकाने ऐन लोकसभा निवडणूकांच्या तोंडावरच केले आहे. पालिका प्रशासनाच्या अधिकार्यांनीदेखील इतर पक्षाच्या पदाधिकार्यांशी बोलताना मांडवेंचीच बाजू घेत आक्षेप घेणार्या नगरसेवकांनी काय उद्योग केले आणि आपणास कशामुळे गप्प बसावे लागत आहे याची ‘टिप’च दिल्याने आता नेरूळमधील इतर पक्षाचे कार्यकर्ते पक्ष म्हणून नाही तर एक चांगला माणूस म्हणून मांडवेंना सोबत करण्याची भाषा बोलू लागले आहेत. गुरूवारी व शुक्रवारी दोन दिवसात मनसे, आप आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हायमस्टचे राजकारण घरोघरी पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे. हायमस्टचा उजेड किती पडेल तो पडेल, पण हायमस्टच्या बाबतीत पालिका प्रशासनावर दबाव आणून राजकारण करणार्या नगरसेवकाच्या पक्षाला मात्र या हायमस्टमुळे नेरूळमधील पश्चिम महाराष्ट्रातील घटकांची नाराजी सहन करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.