अमोल शीरसागर
नवी मुंबई : महापालिकेच्या तिसर्या सभागृहात शिवसेनेचे नगरसेवक फुटून अष्टविनायक गट स्थापन करण्यात आला होता. या अष्टविनायक गटाला राष्ट्रवादीचेच सहकार्य असल्याने शिवसेनेत फाटाफूट पडली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नाराज नगरसेवकांना चुचकारण्याचे शिवसेनेच्या काही घटकांकडून गेल्या अडीच महिन्यापासून प्रयास सुरू असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सात नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या अष्टविनायकाच्या खेळीला शिवसेना तुर्तास सप्तपदीचे उत्तर लोकसभा निवडणूकीच्या तोंडावरच देवून आपला हिशोब चुकता करणार असल्याचे नवी मुंबईच्या राजकारणात दबक्या आवाजात बोलले जावू लागले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गडाला खिंडार पाडण्याचे काम शिवसेनेतील स्थानिक भागातील काही महत्वाकांक्षी घटकांकडून गेल्या तीन-चार महिन्यापासून सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील तत्कालीन मातब्बर प्रस्थ विजय चौगुले यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकून शिवसेनेच्या जय महाराष्ट्रला लळा लावला, त्यावेळीच शिवसेनेच्या आठ नगरसेवकांनी सेनेला जय महाराष्ट्र करत अष्टविनायकाची निर्मिती करीत शिवसेनेला खिंडार पाडले. ही सर्व तत्कालीन परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच खेळी होती. या अष्टविनायकाला खेळीला ऐन निवडणूकीच्या रणधुमाळीतच सप्तपदीने उत्तर देण्याची जय्यत तयारी शिवसेनेच्या स्थानिक भागातील मातब्बरांकडून सुरू झाली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सर्वाधिक मोठी फूट पालिकेच्या दुसर्या सभागृहात १६ नोव्हेंबर २००२ रोजी झालेल्या महापौरपदाच्या निवडणूकीच्या अगोदर पडली होती. डी.आर.पाटील, रमण भोईर, नारायण पाटील यांच्यासह काही नगरसेवक या फाटाफूटीत सहभागी झाले होते.
लोकसभा, विधानसभा आणि नवी मुंबई महापालिकेत स्पष्ट बहूमत हे चित्र पाहिल्यावर वरकरणी सर्व काही आलबेल दिसत असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पालिका सभागृहातील नगरसेवकांमध्ये गेल्या दोन वर्षापासून धुसफूस कायम आहे. गोठीवलीतही नाराज नगरसेवकांचा गोतावळा जमला होता. पण १७च्या पुढे आकडा न सरकल्याने खतरा उचलण्याचे धाडस कोणी दाखविले नाही. शिवसेनेशी सलगी बांधलेल्या नगरसेवकांमध्ये सहा नगरसेवक ऐरोली विधानसभेतील तर उर्वरित एक बेलापूर विधानसभा मतदारसंघातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशोक गावडेंनी उपमहापौर पदाचा अर्ज भरल्यावर बोनकोडेशी नाते असणार्या कोपरखैरणेतील एका नगरसेवकाने घणसोलीच्या संजय पाटील यांच्याशी बोलताना तत्कालीन स्थायी समिती सभापती संपत शेवाळेंच्या दालनात शेवाळेंच्या समक्ष आपला संताप व्यक्त केला होता. हा संताप नेरूळ गाव, सिवूड्स आणि सारसोळेच्या घटकांनी जवळून पाहिला होता.
वैभव नाईकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून राष्ट्रवादीमधील नाराज नगरसेवकांचे धाडस पुन्हा वाढीला लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहून शिवराळ भाषेची पाटीलकी जोपासणारे मातब्बर याचे नेतृत्व करणार असल्याचे शिवसेनेच्या घटकांकडून उघडपणे सांगितले जात असून ऐन निवडणूकीत राष्ट्रवादीतून बाहेर पडून शिवसेनेचा प्रचार करायचा आणि आपल्या पालिका प्रभागातील पोटनिवडणूका शिवसेनेच्या तिकीटावर लढायच्या असा बेत राष्ट्रवादीमधील नाराजांचा आणि त्यांना सांभाळणार्या शिवसेनेतील घटकांचा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आज शिवसेनेच्या गळाला सप्तपदी असली हा आकडा वाढण्याचा दावा शिवसेनेच्या तोडफोडमध्ये स्वारस्य दाखविणार्या घटकांकडून केला जात आहे. बोनकोडेतील कलशाचे वैभव शिवसेनेत गेल्यावर बालाजीला तडे देण्याची योजना शिवसेनेच्या काही घटकांकडून सातत्याने आखली जात आहे. गत तीन महिन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ग्रामस्थ नगरसेवकांनाही कलशाच्या वैभवाचा लळा लागल्याचे पडद्यामागील घडामोडीदरम्यान पहावयास मिळत आहे.
सप्तपदीतील तीन नगरसेवकांचा शिवसेना प्रवेशाचा निर्णय ठाम असला तरी दोन नगरसेवकांना अजूनही ना. गणेश नाईकांप्रती आत्मियता असल्याने राष्ट्रवादीच्या अजून काही नगरसेवकांना गळाला लावण्याचे शिवसेनेच्या संबंधित घटकांकडून जोरदारपणे सुरू आहे. ना. नाईकांचा अजून किमान १५ दिवस या नाराजाशी संपर्क होवू नये, विस्तृत चर्चा होवू नये यासाठीही शिवसेनेचे संबंधित घटक धडपड करत आहेत. राष्ट्रवादीच्या अष्टविनायकाला शिवसेना सप्तपदीचे चोख उत्तर देते अथवा सप्तपदीमध्ये आणखी राष्ट्रवादीच्या नाराज नगरसेवकांची भर घालते अथवा शिवसेनेच्या गळाला लागलेली सप्तपदी निवडणूकांधील सनईच्या सूरांचा आवाज कानावर पडल्यावर पुन्हा एकवार बालाजीवर गणेशाचे दर्शन घेण्यात समाधान मानते, हे नजीकच्या काळात पहावयास मिळणार आहे.