योगेश शेटे
नवी मुंबई : दिघा ते बेलापूरदरम्यानच्या नवी मुंबई पट्टीत सारसोळे गाव गेल्या काही वर्षापासून चांगलेच नावारूपाला आलेल्या सारसोळे गावाची प्रत्येक गोष्टीची आज दखल घेण्यात येवू लागली आहे. होळीच्या दिवशी मध्यरात्री पेटविण्यात येणारी होळी मैदानावरची सारसोळे ग्रामस्थांची होळी हीदेखील नवी मुंबईकरांमध्ये आकर्षणाचा विषय ठरू लागली आहे.
सारसोळेच्या कोळी वाड्यातील होळी मैदान. रविवार सकाळपासूनच होळी मैदानावर ग्रामस्थांची लगबग सुरू आहे. नवी मुंबईतल्या कार्यक्षेत्रातल्या ठिकठिकाणच्या होळ्या लक्षवेधी असल्या तरी सारसोळेकरांच्या होळीची सर कोणाला येणे शक्यच नाही. होळी मैदानात गेल्या काही वर्षापासून नाही तर पिढ्या न् पिढ्या सारसोळेकर ग्रामस्थ होळीचे आयोजन करत आहेत. मध्यरात्री १२ वाजता सारसोळेकर ग्रामस्थ होळी पेटवित असतात.
सारसोळेकरांची होळी सजविण्याची पध्दतीदेखील अनोखी असल्याने ही होळी नवी मुंबईत नेहमीच चर्चेचा विषय बनते. २५० ते ३०० किलो फुले आणून सारसोळेचे ग्रामस्थ होळीची सजावट करत असतात. या होळीला केवळ सारसोळेचे ग्रामस्थच नाही तर सभोवतालच्या परिसरातील रहीवाशीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित असतात. सारसोळेकरांच्या होळी मैदानावरील होळीला एक भावनिकतेची झालर असते. होळी साजरी करताना सारसोळेकरांचे परिश्रम पाहिल्यावर होळीवरील प्रेमाची प्रचिती येते. सारसोळेकर ग्रामस्थ सध्या जनता दरबार, पालिका मुख्यालय , नेरूळ विभाग कार्यालय आणि मंत्रालयातही चर्चेचा विषय बनू लागले आहेत. बेलापूर, बोनकोडे, चिंचपाडा इतके मातब्बर राजकारणी सारसोळेच्या कोळीवाड्यात राहत नसले तरी प्रशासन दरबारी समस्यांचा पाठपुरावा करताना गेल्या ६/७ वर्षामध्ये सारसोळेच्या युवा, होतकरू ग्रामस्थांनी आजमितीला आपल्या गावाला एक वेगळेच वलय प्राप्त करून दिले आहे.