मकरंद वैती
नवी मुंबई : ठाण्याच्या लोकसभेकडे राज्यातील रथी-महारथींचे लक्ष लागून राहीले आहे. अद्यापि राज ठाकरेंनी मनसेचा उमेदवार जाहीर केलेला नसल्याने लढतीचा रंग चढणार की बेसूर होणार याचा उलगडा अजून झालेला नाही. ठाण्याची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी पर्यायाने ना. गणेश नाईकांसाठी आणि शिवसेनेसाठी पर्यायाने आ. एकनाथ शिंदे, आ. प्रताप सरनाईक, आ. राजन विचारेंकरीता प्रतिष्ठेची असल्याने प्रतिस्पर्ध्यांच्या कमकुवत दुव्याचा आणि प्रबळ बाबींचा शोध आणि बोध घेण्याचे पडद्याआडून प्रयास सुरू झाले आहेत. नवी मुंबईत महीला बचत गटांवर निवडणूक काळात पैशाची होणारी उधळण आणि त्यामाध्यमातून एकगठ्ठा मते लाटण्याचे प्रकार मागील लोकसभा, विधानसभा आणि नवी मुंबई महापालिका निवडणूकीत वाढीस लागलेे आहेत.
शिवसेना, मनसे आणि आपच्या तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घटकांचे ‘व्हिटॉमिन एम’चे पारडे जड असल्याने महिला बचत गटांच्या माध्यमातून पैशाचे होणारे वाटप उघडकीस आणून निवडणूक आयोग आणि पोलीसांच्या माध्यमातून परस्परांना जेरीस आणण्याची रणनीतीदेखील जोर धरू लागली आहे. शह-काटशहाच्या राजकारणात निवडणूकांमध्ये मिळणार्या पैशाकडे टक लावून बसणार्या महिला बचत गटांच्या सदस्यांना व पदाधिकार्यांनाही वेळ पडल्यास पोलीस ठाण्याच्या चपला झिजवाव्या लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महिला बचत गटांना पोलीस ठाण्याच्या वार्या कराव्या लागल्या ना, मगच त्यांची पैसे घेवून मते विकण्याची हौस भागेल असे राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांकडून , कार्यकर्त्यांकडून उघडपणे सांगितले जात आहे. पाच वर्षे आम्ही मर मर मरायचे, प्रामाणिकपणे काम करायचे आणि निवडणूका आल्यावर काम न करणार्यांनी महिला बचत गटांना अर्ज वाटून पैसे उधळून मॅनेज करायचे, हे असले धंदे यापुढे नवी मुंबईत चालू न देण्याचा संताप आता मनसैनिकांकडून आणि शिवसैनिकांकडून व्यक्त केला आहे. त्यातच नवी मुंबईच्या राजकारणात नव्याने सहभागी झालेल्या आपच्या सदस्यांकडेही प्रस्थापितांसह अन्य राजकीय घटकांना कानडोळा करणे महागात पडण्याची शक्यता आहे. आपच्या सदस्यांचे ग्रासरूटवर संपर्क असल्याने त्यांच्याकडूनच महिला बचत गटांच्या आमिषाची ‘भांडाफोड’ होण्याची शक्यता अधिक व्यक्त केली जात आहे.
एका राष्ट्रीय पक्षाकडून नवी मुंबई कार्यक्षेत्रात गेल्या पाच-सहा दिवसापासून महिला बचत गटाच्या सदस्यांना अर्ज वितरीत केले जात असून त्यांच्याकडून फोटो, रेशनिंग कार्डची झेरॉक्स, वीज बिलाची झेरॉक्स आणि आधार कॉर्डची झेरॉक्स जमा करण्याचे काम त्या पक्षाच्या पदाधिकार्यांकडून सुरू झाले आहे. बचत गटाच्या महिला सदस्यांना व पदाधिकार्यांना ठराविक एका पक्षाच्या राजकारण्यांकडून वितरीत करण्यात आलेल्या अर्जामध्ये स्थानिक नगरसेवकाचे अथवा वॉर्ड अध्यक्षाचेमहिला सदस्याची माहिती, घरातील सदस्यांची माहिती, गावचा व येथील स्थानिक पत्ता, घरातील सदस्यांची नावे, फोन क्रमांक, तसेच नवी मुंबई, ठाणे आणि मिरा-भाईंदरमधील नातेवाईकांची नावे, त्यांचा भ्रमणध्वनी आदी विस्तृतपणे तपशीलवार माहिती संकलनाचे काम तीव्र गतीने सुरू आहे. गेल्या निवडणूकीचे अनुदान अजून मिळाले नसल्याने आताही अर्ज भरून केवळ मते लाटण्याचेच काम करणार का, असा संतप्त सूर ठिकठिकाणच्या महिला बचत गटांच्या सदस्यांकडून आळविला जावू लागला आहे. मनसेचा उमेदवार अजून जाहीर केला नसला तरी बेलापूर विधानसभा जिंकण्याचे मनसेच्या घटकांची महत्वाकांक्षा पाहता वितरीत झालेल्या अर्जावर आणि बचत गटांवर त्यांचीही शिवसेनेप्रमाणेच करडी नजर आहे. महिला बचत गटांना वितरीत झालेल्या या अर्जाबाबत निवडणूक आयोगाला कळविले का, निवडणूक खर्चात समावेश करणार का, आदीबाबतची विचारणा थेट प्रचारसभांमधूनच करण्याचा अन्य राजकीय धुरींणाचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महिला बचत गटांना मागील निवडणूकांप्रमाणे यंदाही पैसे मिळण्याची दाट शक्यता असली तरी हा अळीमिळी गुपचिळीचा प्रकार बचत गटांच्या सदस्यांना आणि पदाधिकार्यांना पोलीस ठाण्याच्या पायर्याही चढण्यास भाग पाडू शकतो. त्यामुळे महिला बचत गटांच्या सदस्यांनी व पदाधिकार्यांनी सर्वप्रथम आपल्या पतीराजांचा सल्ला घ्यावा, कारण कोणत्याही पतीला आपली पत्नी बचत गटाच्या पैशामुळे पोलीस ठाण्यात गेली हे आवडणार नाही असे मनसेच्या काही घटकांकडून आवाहन केले जात आहे. त्यामुळे प्रचार रंगण्याआधी, उमेदवारी जाहीर होण्याआधी आणि उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच शिवसेना, मनसे आणि आपचे घटक कमालीचे सतर्कता दाखवित असल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघातील घडामोडी ग्रासरूटपर्यत वादळी व वादग्रस्त ठरण्याची शक्यता आतापासूनच निर्माण झालेली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ऑक्टोबर २०१४मध्ये होणार्या विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीमच असल्याने शिवसेना-मनसे आणि आपचे घटक गल्ली-बोळात, कानाकोपर्यातील घडामोडी टिपू लागल्याने यंदा सर्व काही आलबेल नसल्याची जाणिव कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या आघाडीलादेखील झाली असणार.