अमोल शीरसागर
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेच्या उद्यानाची संरक्षक भिंत गेल्या काही महिन्यापासून तुटून पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. वारंवार लेखी तक्रारी करूनही सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस व महापालिका प्रशासन तक्रारींना केराची टोपली दाखवित आहे. या उद्यानालगतच्या सिडकोच्या इमारतीत चोरट्यांनी चोरी, घरफोडी अथवा दरोडा टाकल्यावरच पालिका प्रशासन उद्यानाची तुटलेली भिंत दुरूस्त करणार का असा संतप्त सवाल नेरूळ तालुका कॉंग्रेसचे चिटणिस मनोज मेहेर यांनी केला आहे.
नेरूळ सेक्टर ६ परिसरात सुश्रुषा रूग्णालयासमोरील सिडको वसाहतीमधील नेरूळ सी-व्ह्यू या इमारतीलगतच महापालिकेचे उद्यान आहे. हे उद्यान व नेरूळ सी-व्ह्यू ही सिडकोची गृहनिर्माण सोसायटीमध्ये एक संरक्षक भिंत आहे. अडीच वर्षापूर्वी ही उद्यानाची संरक्षक भिंत तूटून पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. उद्यानाची संरक्षक भिंत तुटल्याने उद्यानातून थेट नेरूळ सी-व्ह्यू इमारतीमध्ये कोणालाही ये-जा करणे शक्य आहे. पालिका उद्यानाच्या तुटलेल्या संरक्षक भिंतीमुळे नेरूळ सी-व्ह्यू या सिडकोच्या गृहनिर्माण सोसायटीची सुरक्षितता धोक्यात आल्याचे पाहून कॉंग्रेसचे नेरूळ तालुका चिटणिस व सारसोळे गावचे ग्रामस्थ मनोज मेहेर यांनी महापौर, उपमहापौर, आयुक्त, शहर अभियंता, अतिरिक्त आयुक्त, उद्यान विभागाचे कार्यकारी अभियंता, नेरूळ विभाग अधिकारी तसेच पालकमंत्र्यांचा जनता दरबार आदी ठिकाणी सातत्याने लेखी तक्रारी करून या समस्येचे लक्ष वेधण्याचा प्रयास केला आहे. महापौर व उपमहापौरांना लेखी निवेदनातून समस्येचे गांभीर्य जाणून घेण्यासाठी पाहणी अभियानाचेही लेखी स्वरूपात मनोज मेहेर यांनी संबंधितांना साकडेही घातले होते. पण सत्ताधार्यांनी व महापालिका प्रशासनाने आपल्या इतर पत्रांप्रमाणे याही पत्रांना केराची टोपली दाखविली असल्यामुळेच उद्यानाच्या तुटलेल्या संरक्षक भिंतीची डागडूजी अद्यापि न झाल्याचा आरोप मनोज मेहेर यांनी केला आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसर व सारसोळे गावात नागरी कामाच्या बाबतीत केवळ कॉंग्रेसवालेच पाठपुरावा करत असल्याने पालिका प्रशासन व सत्ताधारी नागरी सुविधांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशी व सारसोळे गावचे ग्रामस्थ गेल्या काही वर्षापासून समस्या निवारणात व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात कोण किती स्वारस्य दाखवित आहे हे जवळून पाहत असल्याने लोकसभा व विधानसभा निवडणूकीत ते नक्कीच आपला प्रक्षोभ मतपेटीतून व्यक्त करण्याची भीती मनोज मेहेर यांनी व्यक्त करत आपल्या पत्रांना पालिकेचे सत्ताधारी केराची टोपली दाखवून सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामधील कामे करत नसल्याने आपण कोणत्या तोंडाने स्थानकि जनतेसमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांकरीता प्रचार करायचा अशी व्यथा मनोज मेहेर यांनी बोलून दाखविली आहे.