मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : देशभरात लोकसभा निवडणूकीचे वारे जोरदारपणे वाहत असतानाच नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना मात्र वर्षांने होणार्या महापालिका निवडणूकीचे वेध लागले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणूकीचा आपला स्वार्थ अथवा कार्यभार साधल्यावर नंतर पुढच्या लोकसभा, विधानसभेपर्यत कोणी विचारत नसल्याने याच निवडणूकीत आपली पालिका तिकीट पक्की करण्याची खेळी काही मातब्बर इच्छूकांकडून सुरू झाली आहे. इच्छूकांची मांदीयाळी अन्य पक्षांच्या तुलनेत शरद पवारांच्या एनसीपीतच असल्याने संजीव नाईकांना प्रचारातील शेवटच्या काही दिवसांमध्ये इच्छूकांच्या रणनीतीचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकानंतर नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूका होत असल्याने पक्षातील वरिष्ठांचा फायदा होत असल्याचे आणि स्थानिक महत्वाकांक्षी कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासूनच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीपासून पहावयास मिळत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूका झाल्यावर वरिष्ठ पालिका निवडणूकीत फारशी दखल घेत नसल्याचा अनुभव स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना येवू लागला आहे. अन्य पक्षांच्या तुलनेत एनसीपीमध्ये स्थानिक पातळीवरील नाराज महत्वाकांक्षींची संख्या गेल्या चार-पाच दिवसात वाढू लागल्याने पडद्याआडच्या घडामोडींनी नवी मुंबईच्या होमपीचवरच संजीव नाईक मतपेटीच्या माध्यमातून अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
अन्य पक्षांच्या तुलनेत एनसीपीमध्ये पालिका निवडणूक लढविण्यासाठी महत्वाकांक्षी इच्छूकांची संख्या अधिक पहावयास मिळत आहे. एनसीपीमध्ये प्रभागाप्रभागातील महत्वाकांक्षी घटक गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक, सागर नाईक या घटकांशी अधिकाधिक संपर्कात राहून पालिका निवडणूक लढण्याची रणनीती आखत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत सलगी साधणारे नेतृत्व मात्र पालिका निवडणूकीत फारसा ‘भाव’ देत नसल्याची भावना मागील अनुभवातून प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये वाढीस लागली आहे. त्यामुळे पालिका निवडणूकीत आपला नेता आपल्यासाठी तिकीट देवू शकत नसल्याचे शल्य त्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागते. आपण घरादाराचा विचार न करता नेत्यासाठी कष्ट केले आणि तोच नेता आपल्याला पालिका निवडणूकीत तिकीट देवू शकत नसल्याचे शल्य आजही मातब्बर कार्यकर्त्यांकडून उघडपणे व्यक्त केले जात आहे.
लोकसभा निवडणूकीत नवी मुंबई परिसर एनसीपीचा बालेकिल्ला गणला असला तरी कॉंग्रेस व शिवसेनेने या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. एनसीपीमधील प्रभागाप्रभागातील मातब्बर इच्छूकांना चुचकारण्याचाही प्रयास ठिकठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सुरू झाला आहे. एनसीपीतील घटक दुसर्या पक्षातील पदाधिकार्यांना पक्षप्रवेशासाठी काम करत असताना एनसीपीच्या खेळीला त्याच शैलीत प्रत्युत्तर देण्याचे काम शिवसेनेच्या काही घटकांकडून सुरू झाले आहे. तुमच्याकडून लोकसभेला, विधानसभेला काम करवून घेता, पण पालिकेला तुम्हालाच तिकीट मिळणार याची खात्री आहे का, लोकसभा-विधानसभा निवडणूक झाल्यावर तुम्हाला कोण विचारते का असे मर्मी शाब्दिक घाव घालण्याचे काम शिवसेनेचे काही घटक एनसीपीच्या मातब्बर इच्छूकांना करू लागल्याने अनेक ठिकाणी एनसीपीच्या कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आपण लोकसभेला, विधानसभेला मेहनत केली आणि पालिकेला दुसर्यालाच तिकीट दिले तर आपली मेहनत पाण्यात जाणार अशी विचारणा मातब्बर महत्वाकांक्षी इच्छूक आपल्या निकटवर्तीयांकडे करू लागले आहेत.
महापालिका निवडणूकीत आपल्याला तिकीट मिळणार नसेल तर लोकाच्या बापासाठी आपण कशाला केस कापायचे असा सवाल आता मातब्बर इच्छूक आपल्या कार्यकर्त्यांकडे खासगीत करू लागले आहेत. पालिका निवडणूक लढविण्याची मातब्बराची महत्वाकांक्षा आणि तिकीट आताच खासगीत नेतृत्वाने जाहीर करण्याची मातब्बर इच्छूकांची मनोकामना संजीव नाईकांच्या अडचणीत येत्या काही दिवसात भर टाकण्याची शक्यता आहे. एकाच प्रभागात पाच तर काही प्रभागात ८-१० मातब्बर इच्छूक असल्याने कोणालाही ठोस शब्द देणे एनसीपीच्या उमेदवाराला व त्यांच्या नेतृत्वाला अडचणीचे ठरणार आहे, नाही शब्द दिला तर मातब्बर मन लावून काम करण्याची शक्यता अशी अडचण एनसीपीची करण्याची विरोधकांची खेळी यशस्वी ठरण्याची शक्यता अनेक प्रभागांमध्ये पडद्याआडच्या घडामोडीमध्ये दिसू लागली आहे.