योगेश शेटे
नवी मुंबई : बोनकोडेकर नाईक परिवाराच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातील अविकसित असलेले सारसोळे गाव चांगलेच लक्षात असणार! बामणदेव, सारसोळे जेटी, स्मशानभूमी, पालिका शाळा, वेस यासह अन्य नागरी सुविधा व नागरी समस्या निवारणासाठी सारसोळेचा युवा ग्रामस्थ आणि नेरूळ तालुका कॉंग्रेसचा चिटणिस मनोज मेहेर यांनी महापौर, उपमहापौर, पालकमंत्री सर्वांनाच सातत्याने पाठपुरावा केला आहे. मुलांच्या ३ मार्चला दहावीच्या परिक्षा सुरू झाल्या आहेत, तुम्ही ४ मार्चला माझ्या परिसरातील नेरूळ सेक्टर ६मध्ये जाहीर सार्वजनिक कार्यक्रम घेवू नका असे जनता दरबारात उघडपणे सांगत पालकमंत्र्यांच्याच कार्यक्रमाला जाहीरपणे विरोध केला होता. सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहाच्या विकासाकरीता महापालिका ते पालकमंत्री सर्वांनाच पाठपुरावा करणारा मनोज मेहेरची बोनकोडेविरोधक अशीच प्रतिमा निर्माण करण्यात आली. परंतु बोनकोडेच्या युवराजाचे व नवी मुंबईच्या ओबामा म्हणून राज्याच्या राजकारणात प्रसिध्द असणार्या संदीप नाईकांनी सारसोळेच्या युवा ग्रामस्थांशी राजकारणविरहीत नाते जोडले आहे आणि ते सातत्याने जपलेही आहे. सारसोळे गावच्या यात्रेचे निमत्रंण संदीप नाईकांना देण्यात आले. निवडणूक प्रचारात व्यस्त असतानाही वेळात वेळ काढून संदीप नाईक आले. मच्छिमार संस्थेच्या कार्यालयात तब्बल तासभर बसले. सारसोळे ग्रामस्थांशी व नेरूळ सेक्टर सहामधील उपस्थित नागरिकांशी मनमोकळा सुसंवाद साधत संदीप नाईकांनी सारसोळेच्या ग्रामस्थांची आणि नेरूळ सेक्टर सहामधील नागरिकांची मने जिंकली. ना आश्वासने, ना पैशाचे वाटप, ओबामाचा स्पष्टवक्तेपणा आणि सारसोळे गावाप्रतीची बोलण्यात जाणवलेली आत्मियता यामुळेच ते शक्य झाले. जे ना. गणेश नाईकांना शक्य झाले नाही, सागर नाईकांना समजले नाही, ते सारसोळेवासियांचे प्रेम फक्त संदीप नाईकांनाच उमगले. त्यामुळेच पुन्हा एकवार यात्रेच्या निमित्ताने संदीप नाईकांचा आणि सारसोळेच्या भोळ्याभाबड्या ग्रामस्थांचा ॠणानुबंध पुन्हा एकवार घट्ट झाला.
निवडणूकांपुरताच संदीप नाईकांचा सारसोळे गावाशी संबंध येत नाही. सारसोळेचे ग्रामस्थ ज्यावेळी अष्टविनायक पदयात्रेला निघतात, त्यावेळी संदीप नाईक आर्वजून किती जण जाणार आहेत, काय अडचण आहे का, याची चौकशी करतात. पदयात्रा सुरू असतानाही वारंवार संपर्क करून ख्यालीखुशाली जाणून घेतात, हे कोणत्याही राजकारण्याने आजवर केले नाही, ते संदीप नाईक सातत्याने करतात. संदीप नाईक आपल्या कामाची कधीही मार्केटींग करत नसल्याने संदीप नाईकांच्या कामाची आजवर पाहिजे त्या प्रमाणात प्रसिध्दी झाली नाही. संदीप नाईक हा माणूस सरळमार्गी आहे. छक्केपंजे संदीप नाईकांना आयुष्यात कधी जमले नाही आणि यापुढेही जमणार नाही. जेमतेम अडीच हजाराच्या आसपास सारसोळेच्या ग्रामस्थांचे मतदान. इतरांनी अगदी बोनकोडेकरांनीही सारसोळेकरांकडे गेल्या काही वर्षात कानाडोळाच केला. सातव्या मजल्यावर लेखी निवेदनाचा पाऊस पाडून टाहो फोडूनही सारसोळेच्या दिशेने कधी मान्यवरांच्या गाड्या वळाल्या नाही. पण सर्वसामान्याचा कळवळा असणारे संदीप नाईक मात्र याला सातत्याने अपवाद ठरले. सारसोळे गावात ग्रामस्थांच्या इमारतींच्या मोजणीचा प्रसंग असो, सर्वप्रथम संदीप नाईक धावून आले आहेत. फोनाफोनी संदीप नाईकांनीच केल्या आहेत. कामानिमित्त सारसोळेचे ग्रामस्थ गेल्यावर पालिका शाळेतील पंखे असो, खाडीतील मासेमारी असो, ओळखपत्र असो, जेटीवरील अंधार, जेटीवरील डेब्रिज यासह अन्य मुद्यांच्या खोलात जावून सारसोळेकरांची आस्थेवाईकपणे विचारपुस बोनकोडेत कोणी आजवर केली असेल तर ती फक्त संदीप नाईकांनीच केली आहे. अन्य गावांकडे गणेश नाईक असतील, पण आमच्याकडे पण संदीप नाईक आहे असे आजपण सारसोळेचे ग्रामस्थ अभिमानाने सांगत आहेत.
सारसोळेच्या यात्रेला संदीप नाईक आले होते काही दिवसापूर्वी. सारसोळेच्या गोरगरीब कोळी मित्रांचे यात्रेचे निमत्रंण स्वीकारून संदीप नाईक आले होते. ही राजकीय भेट नसल्याने पक्षीय कार्यालयात जा, स्थानिक पदाधिकार्यांना घ्या, हा प्रोटोकॉल पाळण्याची गरजच नव्हती. संदीप नाईक हा माणूस आपल्या कार्यक्रमाला येणे हीदेखील नवी मुंबईच्या राजकारणात प्रतिष्ठेची बाब मानली जाते. पण सारसोळेकर सुदाम्यांच्या भेटीला श्रीकृष्ण आला, असे वातावरण सारसोळेचे होते.
भेटीतच सुरूवातीला मी तुमच्याकडे मते मागायला नाही तर तुमच्या यात्रेत सहभागी व्हायला आलो असल्याचे संदीप नाईकांनी स्पष्ट केले. सारसोळेच्या ग्रामस्थांनी व नेरूळ सेक्टर सहामधील उपस्थित रहीवाशांनी असंख्य प्रश्न उपस्थित केले. प्रत्येकाचे समाधान होईपर्यत संदीप नाईकांनी समजावून सांगितले. जेटीचा मुद्दा, बामनदेवाचा मार्ग , गावातील मुलांचा रोजगार, आगरी-कोळी भवनातील कामगारांची ससेहोलपट, क्रिकेट खेळातील अडचणी, गावठाणातील इमारतीची नियमितता सर्वच प्रश्नांवर कोणताही आडपडदा न ठेवता चर्चा झाली. काहींनी राजकारणावर टीकेचा सूर आळविताच संदीप नाईकांनी आपण सर्व मित्र आहोत आणि राहणार. तुम्ही तुमच्या सर्व समस्यांचे निवेदन सादर करा आणि निवडणूक संपल्यावर माझ्याकडे कामांचा पाठपुरावा करा. संपर्कात रहा आणि गावाचा कायापालट करून घ्या. मी कामे केल्यावर माझ्या मागे फिरू नका. मुलांच्या कल्याणासाठी व चांगल्या संसारासाठी झटा. दारूच्या आहारी जावू नका. दारूवर होणारा खर्च मुलांवर करा. यापुढे मैदानावर क्रिकेट खेळण्यास कोणी विरोध केलाच तर मी स्वत: तुमच्याबरोबर खेळण्यास येईल, असे संदीप नाईकांनी यावेळी सांगितले.
सिडकोच्या ए टाईपच्या दत्तगुरू या धोकादायक इमारतीचा प्रश्न तेथील रहीवाशांनी मांडताच सर्वजण एकत्रित भेटायला या, पावसाळी अधिवेशनातच समस्या निकाली काढू असे संदीप नाईकांनी सांगितले.
प्रत्येक प्रश्नाला संदीप नाईक उत्तर देत होते. कोणाच्याही प्रश्नाला टाळले नाही. निवडणूकीच्या व्यस्त शेड्यूलमध्ये संदीप नाईक निवांतपणे सारसोळे गावच्या विसाव्याला आले होते. चर्चेच्यावेळी जमलेल्या प्रत्येकाला त्यांनी संदीप खांडगेपाटील यांच्याकडे तुमची निवेदने सादर करा आणि कामाचा रिझल्ट पाहा असे सांगितले.
संदीप नाईक सर्वांच्या समस्या जाणून घेतल्यावरच उठले. नवी मुंबईचा विकास आपणास करायचा असल्याने आपण एकत्रित येवू, मी एकवेळ श्रीमतांचे काम करत नाही, पण गरीबांचे काम पहिले करतो. सारसोळे ग्रामस्थांचे माझ्यावर असलेले पे्रम कायम टिकून राहण्यासाठी तुमच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे सांगताना संदीप नाईकांनी संपर्कात रहा आणि कामे करून घ्या, एवढे सांगून सारसोळेकरांचा निरोप घेतला. यापुढे सारसोळेकरांच्या समस्यांवर आणि बेरोजगारीवर आपण तोडगा काढण्यास पुढाकार घेणार असल्याचे संदीप नाईकांनी सांगितले.
सारसोळे ग्रामस्थांच्यावतीने कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी त्यांचे स्वागत केले. संदीप नाईकांनी आपल्या छोटेखानी भेटीत सारसोळेवासियांची मने जिंकली. जे पालकमंत्र्यांना व महापौरांना जमले नाही, ते संदीप नाईकांनी काही सेंकदात करून दाखविले.