नवी मुंबई : सानपाडा गावातील सोमवारचा बाजार हा स्थानिक नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून केवळ स्थानिक भागातील राजकारण्यांकरीता वैयक्तिक स्वार्थासाठी हा बाजार भरविला जात असल्याचे नागरिकांकडून उघडपणे बोलले जात आहे.नवी मुंबई महानगर पालिका प्रशासन या सोमवारच्या बाजारावर वारंवार कारवाई करूनही हा बाजार कायमस्वरूपी बंद होत नसल्याने पालिका प्रशासनाच्या कार्यप्रणालीबाबत नागरिकांच्या मनामध्ये मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सारसोळे गावासह अन्य भागातील आठवडा बाजार स्थानिकांच्या विरोधानंतर बंद झालेले असताना सानपाडा गावात स्थानिक राजकारण्यांचे चोचले पुरविण्यासाठीच पालिका प्रशासन आठवडा बाजाराप्रती नाकर्तेपणा दाखवित असल्याचा संताप स्थानिकांकडून आळविला जावू लागला आहे.
सानपाडा गावात सुरूवातीला हॉटेल गोल्डन पेलेस जवळ दोन-अडीच वर्षापूर्वी आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी रस्त्यावर अनधिकृतपणे सायंकाळी सोमवारचा बाजार भरविला जात असे.रस्त्यावर भारविल्या जाणार्या या बाजारामुळे नागरिकांचे हाल होत असल्याने नागरिकांनी या बाजाराच्या विरोधात अनेकदा महानगर पालिका प्रशासन दरबारी आवाज उठविला.त्यानंतर या सोमवारच्या बाजारावर महानगर पालिका प्रशासनाकडून कारवाई सुद्धा करण्यात आली.परंतु, हाच सोमवारचा बाजार आता काही अंतरावर स्थलांतरित करून प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी सायंकाळी सानपाडा से-५ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात रस्त्यावर अनधिकृतपणे भरविला जातो.या सोमवारच्या बाजारात बाहेरील फेरीवाल्यांचा अधिक भरणा असतो.या बाजारामुळे रस्त्यावर मोठी वाहन कोंडी होत असून किरकोळ अपघाताच्या घटना सतत घडत आहे.येथे जवळच नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाची शाळा आहे.त्यामुळे भविष्यात येथे आग लागून एखादी मोठी गंभीर घटना घडण्याची शक्यता स्थानिक नागरिकांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बाजाराच्या विरोधात महानगर पालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही पालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे नागरिकांचे सांगणे आहे.तसेच या बाजाराला सानपाड्यातीलच एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याचा आशिर्वाद असल्याची कबुली नागरिकांकडून उघडपणे देण्यात आली आहे.या बड्या नेत्याचे कार्यकर्ते या बाजारातील फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली करीत असल्याची चर्चा सुद्धा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरु आहे. स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी हे बडे राजकीय नेते नागरिकांच्या आयुष्याशी खेळत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात आली आहे.