नवी मुंबई : महापालिका प्रभाग ६९ मधील पालिका शाळा क्रमांक १२ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयात सकाळी मतदान सुरू होण्यास १५ मिनिटे ते अर्धा तास उशिर झाला, मात्र मतदान सांयकाळी ६ वाजता वेळेवरच बंद केले. वाढीव वेळ देण्याचा शब्द निवडणूक अधिकार्यांनी न पाळल्याने शिवसेना शाखाप्रमुख विरेंद्र लगाडे यांनी नाराजी व्यक्त करत निवडणूक केंद्रावर गोंधळ घालत जे मतदानाला आले आहेत, त्यांना तरी मतदान करू देण्याचा टाहो फोडला.
कॉंग्रेसचे नेरूळ तालुका चिटणिस मनोज मेहेर यांच्या प्रभागातील कामानिमित्त मनपा ते मंत्रालयीन पातळीवरील पाठपुराव्यामुळे नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावाचा समावेश असलेल्या प्रभाग ६९ मध्ये गुरूवारी मतदानास सकाळी ७ वाजताच मतदारांनी गर्दी केली. त्यावेळी मतदान मशिन तात्काळ कार्यान्वित न झाल्याने काही ठिकाणी १५ मिनिटे तर काही ठिकाणी मतदानास ३० मिनिट उशिर झाला. मशिनमधील बिघाडामुळे विलंब झाल्याचे मान्य करत सांयकाळी ६ या निर्धारीत वेळेनंतर मतदार असल्यास अतिरिक्त वेळ देण्याचे शाळेतील निवडणूक अधिकार्यांनी मान्य केले. तथापि निवडणूक केंद्रावर मतदार असतानाही सांयकाळी ६ नंतर तात्काळ क्षणाचाही विलंब न करता मतदान थांबविण्यात आले. निवडणूक अधिकार्यांच्या या कृतीवर तात्काळ आक्षेप घेत शिवसेना शाखाप्रमुख विरेंद्र लगाडे यांनी आपला संताप व्यक्त केला. एकतर मतदान मशिनमधील बिघाडामुळे मतदानाला विलंब करता आणि मतदान वेळेवर बंद करता, निवडणूक अधिकारी दिलेला शब्द पाळत नाही, निवडणूक अधिकार्यांच्या दुटप्पी भूमिकेचा व मतदारांना मतदान न करू दिल्याचा संताप शाखाप्रमुख लगाडे यांनी व्यक्त केला.