योगेश शेटे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात काम करणार्या माथाडी घटकांना क्षणभर विश्रांती मिळण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आठ वर्षापूर्वी माथाडी भवन उद्यानाची निर्मिती केली खरी, पण आजमितीला माथाडी भवन उद्यानाची दुर्रावस्था पाहिल्यावर पालिका प्रशासनात वर्षानुवर्षे वावरणार्या सत्ताधारी एनसीपीचे माथाडी घटकावरील प्रेम बेगडी असल्याची घणघाती टीका शिवसेना नगरसेवक व स्थायी समिती सदस्य रतन नामदेव मांडवे यांनी केली आहे.
मतदान संपल्यावर सर्वच पक्षाचे राजकीय नेतेमंडळींपासून तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यत सर्वच शुक्रवारी विश्रांती घेत असताना शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवे हे आपल्या शिवसैनिकांसह एपीएमसी मार्केटमधील आपल्या प्रभागात राहणार्या माथाडी कामगारांची भेट घ्यावयास गेले होते. निवडणूकीत शिवसेनेला केलेल्या सहकार्याबद्दल नगरसेवक मांडवे यांनी मार्केटमधील माथाडी व वारणार यांचे गाळ्यागाळ्यामध्ये आभार मानले. त्यावेळी काही माथाडी कामगारांनी किराणा दुकान मार्केट व माथाडी भवनच्या मध्यभागी असलेल्या माथाडी भवन उद्यानाच्या दुर्रावस्थेची समस्या मांडत या उद्यानाला पालिका प्रशासनाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याची मागणी केली. सत्ताधारी एनसीपीला निवडणूकीतच माथाडी कामगारांचा व एपीएमसी मार्केटचा पुळका येतो, अन्य वेळी मात्र विसर पडतो असा जाहीर संताप व्यक्त करत आठ वर्षानंतर माथाडी भवन उद्यानाला पालिकेत एकहाती सत्ता असतानाही न्याय देवू शकले नाही, ते आम्हा माथाडी कामगारांना काय न्याय देणार, अशा प्रतिक्रिया माथाडी कामगारांकडून उघडपणे व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी शिवसेना नगरसेवक व स्थायी समिती सदस्य रतन नामदेव मांडवे यांनी माथाडी कामगारांसमवेत या उद्यानाजवळ गेले असता, ९ एप्रिल २००६ मध्ये माथाडी नेते संभाजीराव पाटील यांच्या हस्ते या माथाडी भवन उद्यानाचा लोर्कापण सोहळा झाल्याचे कोनशीलेवरून समजले. उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील लोखंडी प्रवेशद्वार पूर्णपणे गंजलेले असून गेल्या काही वर्षात उद्यानाचा दरवाजा कधी उघडला असेल की नाही, त्याबाबत प्रश्नचिन्हच आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे सुभाषित लिहीलेले आहे. प्रत्यक्षात आतमध्ये वेगळेच भयावह चित्र नगरसेवक मांडवेंना पहावयास मिळाले. हे उद्यान आहे की अविकसित क्रिडांगण आहे याबाबत संभ्रम निर्माण होतो. हे उद्यान आजही भकास व अविकसित अवस्थेतच आहे. उद्यानाच्या अर्ध्या भागात पूर्णपणे सुकलेले गवत आणि मातीचे ढिगारे पहावयास मिळाले. उद्यानातील व्यासपिठाचीही दुर्रावस्था झालेली आहे. उद्यानातील विहीरीवरही जंगली झुडपे पहावयास मिळतात. उद्यानाच्या दुसर्या भागात सुकलेले गवत आणि मृतप्राय छोटेखानी झाडे दिसतात. हे उद्यान कागदोपत्री असले तरी प्रत्यक्षात अविकसित क्रिडांगणच असल्याचा भास होतो. लोर्कापण झाल्यापासून प्रशासनाने माथाडी भवन उद्यानाकडे काहीही लक्ष न पुरविल्याची माहिती माथाडी कामगारांनी नगरसेवक मांडवे यांना दिली.
उद्यानाच्या मागील बाजूची संरक्षक भिंत तुटली असून त्यादिशेने अधिकांश भागावर हरिओम ऍटो गॅरेजवाल्याने अतिक्रमण केले असून या अतिक्रमणाकडे माथाडी नेत्यांनी व माथाडींचे प्रतिनिधी असणार्या एनसीपीच्या आमदारांनी आजतागायत काहीही केले नसल्याचा संताप माथाडी भवनात उपस्थित असणार्या माथाडींनी व्यक्त केला.
बाजार समिती आवारात काम करणार्या माथाडी कामगारांना क्षणभर विश्रांती घेण्यात यावी यासाठी या उद्यानाची निर्मिती करण्यात आली असली तरी महापालिकेत सत्ताधारी एनसीपीने माथाडी कामगारांप्रमाणेच माथाडी भवन उद्यानालाही वार्यावर सोडले असल्याचा संताप यावेळी माथाडी कामगारांनी यावेळी व्यक्त केला.
माथाडी भवन उद्यानाची दुर्रावस्था, तेथील असुविधा आणि उद्यान आवारात गॅरेज चालकांचे अतिक्रमण याबाबत आपण पालिका आयुक्तांशी चर्चा करून त्यांना या उद्यानास भेट देण्याविषयी सोमवारीच लेखी पत्र सादर करणार असल्याचे शिवसेना नगरसेवक रतन मांडवे यांनी उपस्थित माथाडी कामगारांना सांगितले.
आपण स्वत: एका माथाडी कामगाराचा मुलगा असल्याने माथाडींच्या नावाने असलेल्या उद्यानात सुविधा पुरविण्यासाठी आपण पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे व वेळ पडल्यास मंत्रालयाच्या नगरविकास खात्याकडेही या उद्यानाच्या समस्येबाबत तक्रार करणार असल्याचे नगरसेवक मांडवे यांनी सांगितले.
निवडणूक मतदानाच्या दुसर्याच दिवशी नगरसेवक मांडवे आपल्या प्रभागात राहणार्या माथाडी कामगारांचे आभार मानण्यासाठी गाळ्यागाळ्यामधून फिरत असताना मतदानासाठी येणार्या व मतदान झाल्यावर पुन्हा एपीएमसी मार्केटकडे न फिरकणार्या एनसीपीच्या नेतेमंडळींनी मांडवेंच्या प्रभागातील विकासकामांना अडथळा करून खुनशी राजकारण करण्यापेक्षा मांडवेंच्या कामाचा आदर्श घ्यावा अशी प्रतिक्रिया एपीएमसी मार्केटमधील घटकांकडून व्यक्त करण्यात येत होती. यावेळी मार्केटमधील अनेक व्यापार्यांनी नगरसेवक मांडवेंना तुमच्या प्रभागातील मंजुुर झालेल्या, वर्क ऑर्डर निघालेल्या हायमस्टचे झालेले दबावाचे राजकारण आम्हाला समजले असून आम्ही तुमच्याच पाठीशी असल्याचे नगरसेवक मांडवेंना सांगितले.