योगेश शेटे
नवी मुंबई : नवी मुंबई नेरूळ से-१ ला वाहनांच्या स्पेअर्स पार्ट विक्रेत्यांचे अतिक्रमण अपघाताला मोठे निमंत्रण देत असून नवी मुंबई महानगर पालिका आणि वाहतूक शाखेचे पोलिस प्रशासन याकडे केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.त्यामुळे नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होत चालले आहे.
नेरूळ से-१ इंडियन ओईल पेट्रोल पंपच्या बाजूस असलेल्या ट्वीन्सलेन्ड अपार्टमेंटच्या तळाला वाहनांच्या स्पेअर्स पार्ट विक्रेत्यांनी नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून रस्त्यासह पदपथावर फार मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे.हे स्पेअर्स पार्ट विक्रेते चारचाकी वाहनांचे स्पेअर्स पार्ट रस्त्यासह पदपथावरच बसवून देण्याचे गँरेजचे काम येथे करतात. त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालणे अवघड होत आहे.गेरेजच्या कामांमुळे येथे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत असून किरकोळ अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. या गेरेजच्या कामांमुळे येथे रस्त्यासह पदपथ काळवंडले आहेत. तसेच याच ठिकाणी बँक ऑफ बडोदा आणि एचडीएफसी बँकचे एटीएम आहे.या अतिक्रमणाच्या गराड्यातून नागरिकांना या एटीएम मध्ये जाणे अवघड झाले आहे. नागरिकांनी महानगर पालिका आणि वाहतूक शाखेचे पोलिस प्रशासन याकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करत असल्याचे नागरिकांचे सांगणे आहे. त्यामुळे नागरिकांनी कमालीची नाराजी व्यक्त केली आहे.