योगेश शेटे
नवी मुंबई : सानपाड्यातील फेरीवाले नवी मुंबई महानगर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे गेल्या अनेक वर्षापासून फेरीवाला मार्केटच्या प्रतिक्षेत असून फेरीवाल्यांना त्यांच्या हक्काच्या फेरीवाला मार्केट पासून नेहमी वंचित रहावे लागत आहे.त्यामुळे स्थानिक गोरगरीब फेरीवाल्याचे दिवसेंदिवस मोठे हाल होत चालले आहे.
सानपाडा से-४ येथील भूखंड क्र.१७ ए हा भूखंड नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनाने फेरीवाला मार्केट व दररोजच्या बाजारासाठी आरक्षित केला आहे. गेल्या १९ वर्षापासून महानगर पालिका प्रशासनाकडून या भूखंडाचा विकास केला जात नसल्याने या भूखंडाला बकालपणाचा मोठा विळखा पडला आहे.हा भूखंड कचर्याचे मोठे आगर बनले असून जागोजागी कचर्याचे मोठे ढीग पहावयास मिळतात.तसेच रात्री येथे लघुशंका तसेच धुम्रपान करण्याचे प्रकारही घडत आहेत.त्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरले असून परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे.आजूबाजूच्या परिसरात राहणार्या रहिवाश्यांचे तसेच फेरीवाल्यांचे आरोग्य धोक्यात येण्यास सुरुवात झाली असून नागरिकांकडून कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच या ठिकाणी भूखंडावर स्टॉल टाकून व्यवसाय करणार्या फेरीवाल्यांना जनरेटरच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी पैसे घेऊन विज देण्याचा एककलमी कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी सुरु आहे.त्यामुळे फेरीवाल्यांना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच स्थानिक गोरगरीब फेरीवाल्यांना रस्ता व पदपथावर व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे.त्यामुळे या फेरीवाल्यांना अनेकदा महानगर पालिकेच्या कारवाईला सुद्धा सामोरे जावे लागत आहे. महानगर पालिका प्रशासनाने या भूखंडावर फेरीवाला मार्केट व दररोजच्या बाजाराला मंजुरी देऊन सुद्धा या ठिकाणी फेरीवाला भूखंडाचा विकास होत नसल्याचे फेरीवाल्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे फेरीवाल्यांकडून तीव्र शब्दात संताप व्यक्त केला जात आहे.