योगेश शेटे
नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समिती आवारात काम करणार्या माथाडी कामगारांच्या समस्या सुटण्याऐवजी त्यात दिवसेंगणिक वाढच होत चालली आहे. कृषी मालाची घटती आवक, स्थानिक भागात कृषी बाजार समित्यांचे वाढते प्रमाण, कृषी मालाचा वाढता चोरटा व्यापार यामुळे माथाडी वर्गाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. माथाडी भवनलगतच असणार्या माथाडी भवन उद्यान एका गॅरेजच्या अतिक्रमण विळख्यात अडकले असतानाही माथाडी नेत्यांची मौनी भूमिका माथाडी कामगारांसाठी संतापाची बाब बनली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात किराणा दुकान मार्केटच्या व माथाडी भवनच्या मध्यभागी मनपा प्रशासनाने माथाडी भवन उद्यानाची निर्मिती करून नऊ वर्षापूर्वीच या उद्यानाचा लोर्कापण सोहळाही झालेला आहे. बाजार आवारात काम करणार्या माथाडी कामगारांना क्षणभर श्रमपरिहार करता यावा यासाठी प्रशासनाने या उद्यानाची निर्मिती केलेली आहे. परंतु प्रशासनाने या उद्यानाची देखभाल ठेवण्यास व डागडूजी करण्यास उदासिनता दाखविल्याने उद्यानाला बकालपणा आला आहे.
उद्यानाच्या मागील बाजूची भिंत गेल्या काही वर्षापूर्वीच तुटली असून भिंत बांधण्यास महापालिका प्रशासनाकडून चालढकलपणा केला जात आहे. उद्यानाच्या लगत माथाडी भवन असून या भवनात माथाडी नेते आ. शशिकांत शिंदे, आ. नरेंद्र पाटील यासह अन्य माथाडी मातब्बर नेतेमंडळींचा व पदाधिकार्यांचा तसेच माथाडी वर्गातील नगरसेवकांचा या ठिकाणी राबता असतो. माथाडी भवनात कार्यक्रमानिमित्त राज्यातील मंत्र्यांनीदेखील माथाडी भवनाला नेहमीच हजेरी लावलेली आहे. तथापि माथाडी भवनाच्या दुर्रावस्थेबाबत आजतागायत कोणी काही आवाज न उठविल्याने माथाडी कामगारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
माथाडी भवन उद्यानाच्या मागील बाजून हरिओम गॅरेजवाल्याने खुलेआमपणे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले असून गॅरेजमध्ये दुरूस्तीसाठी येणारी वाहने उद्यानाच्या मागील बाजूस उभी करण्यात येत आहे. गॅरेजमुळे उद्यानाला बकालपणा आला असून उद्यानात अतिक्रमण करणार्या गॅरेजचा ‘गॉडफादर’ कोण आहेत याचीही माथाडी वर्गामध्ये दबक्या आवाजात चर्चा होत असून हे माथाडी भवन उद्यान नसून माथाडी कामगारांसाठी थडगे उभारले असल्याची संतप्त प्रतिक्रिया माथाडी कामगारांकडून व्यक्त केली जात आहे.
काही दिवसापूर्वी माथाडी कामगारांच्या आग्रहास्तव शिवसेनेचे नेरूळमधील नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी माथाडी भवन उद्यानाला शिवसैनिकांसमवेत भेट दिली होती. उद्यानाची दुर्रावस्था, उद्यानाचा बकालपणा याबाबत नगरसेवक मांडवे यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन सादर करून उद्यान पाहणी करण्याची मागणी केली होती.
माथाडींच्या बळावर राजकारणात मान-सन्मान प्राप्त करणार्या , नगरसेवक-आमदार पदे उपभोगणार्यांच्या उदासिनतेमुळेच माथाडी भवन उद्यानाचा बकालपणा कायम राहीला असल्याचा आरोप माथाडी कामगारांकडून करण्यात येत आहे.