* अंकिता मोटर ट्रेनिंगच्या वाहनाची तोडफोड
* ट्रेनिंग स्कूलसमोरील कुंड्यांची मोडतोड
* पोलीसी जनजागृती करणार्यालाच चोरांचा हिसका
योगेश शेटे
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसर हा गेल्या काही वर्षापासून भुरट्या चोरांचे माहेरघर बनले असून येथील चोरांना पकडण्यात व गुन्ह्याची उकल करण्यात नेरूळ पोलिसांना बाराही महिने अपयशच पदरी पडत आहे. गुरूवारी पहाटे भुरट्या चोरांनी नेरूळ सेक्टर सहामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या अंकिता मोटर ट्रेनिंग स्कूलच्या वाहनांची मोडतोड करत ट्रेनिंग स्कूलसमोरील कुंड्यांचीही मोडतोड केली आहे. कुंड्या फेकून मोटर ट्रेनिंग स्कूलचे रस्त्यावर उभे असलेल्या वाहनाची काचही फोडण्यात आली असून कुंडी थेट वाहनातच आढळली आहे. या घटनेने नेरूळ सेक्टर सहामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भुरट्या चोरांमुळे पुन्हा एकवार दहशतीचे वातावरण पसरले आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसर हा नेरूळ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात भुरट्या चोरांचे माहेरघर म्हणून प्रसिध्द आहे. या परिसरात विहीरींची साफसफाई करताना मनपा कामगारांना दुचाकी वाहने सापडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. नेरूळ सेक्टर सहामधील प्लॉट १५ वरील शिवम सोसायटीत झालेल्या घरफोडीचा व अन्य गुन्ह्यांचाही नेरूळ पोलीसांना आजतागायत शोध घेता आलेला नाही. या परिसरात अनेकदा दुकाने फोडण्याच्या , दुचाकी तसेच चारचाकी वाहने चोरीला जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत. गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात उभ्या असलेल्या दुचाकी वाहनातील इंधन चोरीला जाण्याच्या घटना नेहमीच घडत असतात.
नेरूळ सेक्टर सहामध्ये भुरट्या चोरीच्या, दुकानलुटीच्या, वाहन चोरी, वाहनाच्या काचा फोडणे आदी प्रकार सर्रासपणे वाढत चालले असल्याने नेरूळ पोलीसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकवार प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेरुळ सेक्टर सहा परिसरात व सारसोळे गावात गर्दुल्यांचेही प्रमाण वाढीस लागल्याने त्यांचाही या भुरट्या चोर्यांमध्ये हात असण्याची शक्यता परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सारसोळे गावात बारबालांचे निवासी वास्तव्य वाढू लागल्याने नको त्या घटकांचा वावरही सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात अलिकडच्या काळात वाढीस लागला आहे.
बुधवारी रात्री ११च्या सुमारास दिलीप आमले हे आपले ‘अंकिता मोटर ट्रेनिंग’ बंद करून घरी गेले. गुरूवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते आपले ट्रेनिंग स्कूल उघडण्यासाठी आले असता, त्यांना शटरच्या कुलुपाशी व शेडशी छेडछाड झाल्याचे निदर्शनास आले. दुकानसमोरील कुंड्यांची मोडतोड व दुकानालगत दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसल्या. मोटर ट्रेनिंग स्कूलच्या (एमएच ०४/बीएच५२०६) वाहनाच्या काचा कुंड्या फेकून तोडल्याचे उघड झाले. वाहनातही कुंड्या आढळल्या. नेरूळ पोलीसांनी घटनास्थळी येवून घटनेची माहिती घेतली असून याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. नेरूळ सेक्टर सहा परिसरातील व सारसोळे गावातील भुरट्यां चोरांचा पोलीसांना शोध घेता येत नाही, चोर्या थांबविता येत नसतील तर नेरूळ पोलीस स्टेशनला टाळेच लावण्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दिलीप आमले हे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते असून चोर्या अथवा गुन्हे होवू नये यासाठी सातत्याने ते जनजागृती करत असून प्रसिध्दीपत्रकेदेखील घरोघरी वितरीत करत असतात. चोरांनी त्यांनाच हिसका दाखवून सावध रहाण्यास सूचविले असल्याचे या घटनेतून पहावयास मिळत आहे. नेरूळ पोलीसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकवार गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने नेरूळ पोलिस आता काय करतात, याकडे नेरूळवासियांचे लक्ष लागून राहीले आहे.