शुक्रवारीही नेहमीप्रमाणे सारसोळेकरांची उपेक्षाच!
योगेश शेटे
नवी मुंबई :- पामबीच मार्गालगत सारसोळेच्या खाडीकिनारी असलेल्या बामणदेवाचे दर्शन करण्यासाठी व बामणदेवाच्या मार्गाची पाहणी करण्यासाठी पामबीच मार्गावरूनच दररोज ये-जा करणार्या ना. गणेश नाईकांना अद्यापि मुहूर्तच मिळाला नसल्याचे शुक्रवारी पुन्हा एकवार पहावयास मिळाले.ना. गणेश नाईक बामणदेव मार्गाची पाहणी करण्यासाठी येणार म्हणून उन्हात पामबीच मार्गावर तब्बल दीड-पावणे दोन तास प्रतिक्षा करणार्या सारसोळेकरांच्या पदरी निराशाच पडली. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तेथे उपस्थित मातब्बर कार्यकर्त्यांनी ‘दाबा चार नंबरचे बटन, द्या धनुष्याला मत आणि मग कशी कामे होणार’ असे खुलेआमपणे खिजविण्याचे काम केल्याने सारसोळेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
सारसोळेकरांचे श्रध्दास्थान असलेल्या खाडीअर्ंतगत भागातील बामणदेव आणि त्याकडे ये-जा करण्यासाठी असणारा कच्चा, खाचखळग्याचा रस्ता नवी मुंबईकरांना नाही तर उभ्या महाराष्ट्राला आता परिचयाचा झालेला आहे. बामणदेव हा सारसोळेकरांचा देव असून हाच देव खाडीमध्ये मासेमारी करताना व रात्रीअपरात्री जेटी परिसरात वावरताना आपले रक्षण करतो, अशी सारसोळेकर ग्रामस्थांची भावना आहे.
मनोज मेहेर हा सारसोळेचा युवा ग्रामस्थ आणि आपल्या युवा ग्रामस्थांसमवेत बामणदेवाकडे जाणारा मार्ग पक्का अथवा डांबरी करण्यात यावा यासाठी गेल्या सहा-सात वर्षापासून महापालिका ते मंत्रालय पाठपुरावा करत आहे. या मार्गावर कोठेही खारफुटी नसून सभोवताली काही अंतरावर मात्र खारफुटी आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने खाडीअर्ंतगत सर्व रस्ते डांबरी केले असून बामणदेवाकडे जाणारा मार्ग मात्र डांबरीकरण करण्यास आजतागायत टाळाटाळ केलेली आहे. बामणदेवाचा मार्ग पक्का व्हावा आणि ना. गणेश नाईकांनी बामणदेवाच्या दर्शनासाठी येवून रस्त्याची पाहणी करावी यासाठी मनोज मेहेर व त्याच्यासमवेत असणार्या सारसोळेच्या ग्रामस्थांनी जनता दरबारातही लेखी निवेदने देवून साकडे घातलेले आहे. बामणदेव हा शंकराचाच अवतार असल्याने महाशिवरात्रीच्या दिनी बामणदेवाचा भंडारा भक्तिभावाने व्यापक प्रमाणावर साजरा करत असतात. या भंडार्यासाठी ना. गणेश नाईकांसह, संजीव नाईक, संदीप नाईक, सागर नाईक आदींना सारसोळेच्या ग्रामस्थांकडून दरवर्षी निमत्रंण देण्यात येवूनही कोणीही आजतागायत बामणदेवाच्या भंडार्याला व बामणदेवाच्या दर्शनाला फिरकलेही नाही.
२०१४मध्ये झालेल्या बामणदेवाच्या भंडार्याला सारसोळेच्या ग्रामस्थांनी शिवसेनेचे युवा नेते वैभव तुकाराम नाईक यांना प्रथमच निमत्रंण दिलेे आणि वैभव नाईकदेखील भंडार्यात भक्तिभावाने सहभागी झाले.
शुक्रवारी (दि. ३०) सकाळी पालकमंत्री ना. गणेश नाईक बामणदेव मार्गाची पाहणी करण्यासाठी व बामणदेवाच्या दर्शनासाठी येणार असल्याची वार्ता सारसोळे गावात सकाळीच पसरली.मात्र बामणदेव मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करणार्या मनोज मेहेर व त्याच्या युवा सहकार्यांना कळविण्याची तसदी घेण्यात आली नाही.
ना. गणेश नाईक बामणदेवाच्या दर्शनासाठी व मार्गाच्या पाहणीसाठी येणार म्हटल्यावर दुपारी साडेचार वाजल्यापासून मनोज मेहेर व सारसोळेचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने बामणदेवाकडे जाणार्या मार्गाच्या सुरूवातीलाच पामबीच मार्गावर येवून उभे राहीले. ना. गणेश नाईकांच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी पुष्पगुच्छही आणून ठेवले. अखेर सांयकाळी ६ वाजल्यानंतर ना. गणेश नाईक येणार नसल्याचे उपस्थित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घटकांनी सारसोळेच्या ग्रामस्थांना सांगितले.
ना. गणेश नाईक न येण्याबाबत ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या घटकांकडे विचारणा केली असता, ‘दाबा चार नंबरचे बटन, द्या धनुष्याला मत आणि मग कशी कामे होणार’ असे खुलेआमपणे खिजविण्याचे काम केल्याने सारसोळेच्या ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. आमदार संदीप नाईकांच्या सांगण्यावरून आम्ही काम केले असल्याने मोदी लाट असतानाही आम्ही संदीप नाईकांशी प्रामाणिक राहीलो. आता विधानसभा निवडणूकीत आजच्या खिजविण्याचे मतपेटीतूनच उत्तर देवू अशी संतप्त प्रतिक्रिया सारसोळेच्या युवा ग्रामस्थांकडून उघडपणे व्यक्त करण्यात आली. बामणदेवाकडे यायचेच नाही तर आम्हाला झुलवित कशाला ठेवता, आमच्या भावनेशी कशाला खेळता अशा संतप्त प्रतिक्रिया सारसोळेच्या ग्रामस्थांकडून यावेळी व्यक्त करण्यात आल्या. यावेळी सारसोळेच्या ग्रामस्थांसमवेत नवी मुंबई देशस्थ, आगरी-कोळी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप खांडगेपाटीलही उपस्थित होते.