* आ.संदीप नाईक यांचे अधिकार्यांना निर्देश
* महावितरणच्या दुर्लक्षित कामांचे चित्ररुपी निवेदन
* कामांचा ७ दिवसात अहवाल सादर करणार
नवी मुंबई : ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदार संघात विविध भागात जवळपास २७९ इतके ट्रान्सफॉर्मर आणि ११७८ डी.पी.बॉक्स नादुरुस्त असल्याने त्याचबरोबर झोपडपट्टी भागातील लोंबकळत्या व उघड्या विद्युत
वाहिन्या यामुळे या ठिकाणी शॉक लागून दुर्दैवी घटना झाल्या आहेत. आगामी पावसाळा लक्षात घेता महावितरणने रखडलेली कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आ.संदीप नाईक यांनी महावितरणच्या अधिकार्यांना केल्या. महावितरणच्या अधिकार्यांची काम करण्याची असणारी असमानता यामुळे अनेक कामे रखडल्याचे यावेळी निदर्शनास आणत महावितरणने येत्या ७ दिवसात दिलेल्या निवेदनाचा अहवाल सादर करण्याची मागणी देखील यावेळी केली.
वाशी येथील महावितरणच्या मध्यवर्ती कार्यालयात महावितरणचे अधिक्षक अभियंता अरूण थोरात यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन आ.संदीप नाईक यांनी थोरात यांना सादर केले. यावेळी माजी उपमहापौर भरत नखाते, नगरसेवक भोलानाथ ठाकूर, नगरसेवक नवीन गवते, नगरसेवक रामआशिष यादव, नगसेवक राजू शिंदे, माजी नगरसेवक सुधाकर सोनावणे, परिवहनचे सभापती मुकेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
अनेकदा महावितरणाच्या विभागीय अधिकारी वर्गाशी बैठकीच्या माध्यमातून संवाद साधून नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची पूर्तता केली होती. तर अधिवेशनाच्या काळात महावितरणच्या विषयी तारांकीत प्रश्न देखील मंत्री महोदयांकडे मांडले होते. लोकाभिमुख कामांची पूर्तता व्हावी व नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक व्हावी या हेतूने महत्त्वपूर्ण असणार्या समस्यांची ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदार संघातील दिघा, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, एमआयडीसी परिसर, वाशी, नेरूळ आदी भागांचा आ.संदीप नाईक यांनी मागील काही महिन्यांपासून दौरा करुन तेथील महावितरणच्या विविध कामांचा आढावा घेतला आहे. यात ऐरोली मतदार संघात जवळपास १४५ ट्रान्सफॉर्मर तसेच ७९८ डी.पी.बॉक्स नादुरुस्त त्याचबरोबर बेलापूर मतदार संघात १३४ ट्रान्सफॉर्मर ३७९ डी.पी बॉक्स नादुरुस्त असल्याचे आ.नाईक यांच्या निदर्शनास आले. सर्वच भागात महावितरणच्या दुर्लक्षित
कारभारामुळे आणि झोपडपट्टी भागात आजमितीस विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात आलेल्या नाहीत. लोंबकळत्या वाहिन्यांमुळे अनेक शॉक लागण्याचे प्रकार देखील घडले होते. कळवा फिडरमुळे दिघा व नवी मुंबई प्रभाग-१ मध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होणे, सर्वच डी.बी.बॉक्स, ट्रान्सफॉर्मर व त्यांना संरक्षक भिंत नसल्याने होत असलेले अपघात ही सर्व बाब आज वाशी येथील महावितरणच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत अधिक्षक अभियंता अरुण थोरात यांच्यासमोर प्रत्यक्षातील छायाचित्रांच्या आधारे मांडली. अभियंता थोरात यांनी ही सर्व बाब खरी असल्याचे मान्य करत महावितरणकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल शिष्टमंडळाकडे नाराजी व्यक्त केली. आगामी कालावधीत
महामंडळाकडून निधी प्राप्त होणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रलंबित मागण्या मार्गी लागतील, असे शिष्टमंडळास सांगितले.
आ.संदीप नाईक यांनी १५ दिवसांवर आलेला पावसाळा आणि उद्भवणारी आपतकालीन स्थिती पाहता काही ठिकाणी सुरु असणारी विद्युत वाहिनी दुरुस्ती व जोडणीची कामे युध्द पातळीवर पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या.महावितरणने नागरिकांशी वेळोवेळी संवाद साधून त्यांना माहिती देण्याचे सांगितले. ऐरोली आणि बेलापूर परिसरातील महावितरणच्या समस्यांचे छायाचित्ररुपी निवेदन महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी व विभागीय अधिकारी
यांच्याकडे सादर करुन येत्या ३ जूनपर्यंत त्याबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे थोरात यांनी सांगितले. या समस्यांची पूर्तता न झाल्यास वेळप्रसंगी आंदोलनाचा इशारा आ.नाईक यांनी दिला.