योगेश शेटे
मंचर : ‘दातृत्व व कर्तृत्व यांच्या जोरावर लक्ष्मणशेठ पिंगळे यांनी समाजात एक वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांचा आदर्श घेऊन पिंगळे कुटुंबीयांची वाटचाल सुरू आहे,’ असे प्रतिपादन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
भाजीपाला व कांदा-बटाट्याचे व्यापारी लक्ष्मणशेठ नामदेव पिंगळे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथे आयोजित श्रद्धांजली सभेत आढळराव पाटील बोलत होते.
खा. आढळराव पाटील पुढे म्हणाले, ‘‘व्यापाराच्या माध्यमातून लक्ष्मणशेठ पिंगळे यांनी शेतकरी वर्गाशी स्नेह प्रस्थापित केला. सामाजिक, धार्मिक कार्याची आवड असणारे पिंगळे यांनी दातृत्व व कर्तृत्व या जोरावर वेगळा ठसा उमटविला आहे. वडिलांचा वारसा पुढे नेण्याचे काम बाजार समितीचे संचालक शंकर पिंगळे हे करीत आहे. त्यांच्या माध्यमातून वडगाव काशिबेंग गावचा विकास मार्गी लागला आहे. लक्ष्मणशेठ यांनी पतसंस्था स्थापन करून, आर्थिक मदत मिळवून देऊन अनेकांचे व्यवसाय उभे करण्यास मदत केली.’’ यावेळी आमदार दिलीप मोहिते, ह.भ.प. संतदास महाराज मनसुख, भीमाशंकरचे अध्यक्ष देवदत्त निकम, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके, गणपतराव फुलवडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विवेक वळसे पाटील, के. डी. मोरे, कुलस्वामी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष भास्कर डोके, वसंतराव भालेराव, शरद सोनवणे, नगरसेवक रवींद्र इथापे यांनी मनोगत व्यक्त केले. ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांनी प्रवचन केले. माजी सरपंच बाळासाहेब पिंगळे यांनी प्रास्ताविक, तर बाळासाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी वैभव पतसंस्थेचे संस्थापक काशिराम पिंगळे उपस्थित होेते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर पिंगळे यांनी आभार मानले.