*११ ते १८ जुलैपर्यत स्वाक्षरी मोहिम सुरु राहणार
सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नरेंद्र मोदी सरकारने जाहिर केलेल्या रेल्वे अर्थ संकल्पात ठाणे, नवी मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांना कोणतीही सुविधा न देता त्यांची घोर निराशा केली आहे.रेल्वे प्रवासी भाडयात केलेली अन्यायकारक वाढ आणि रेल्वे अर्थ संकल्पात नवी मुंबईकरांची केलेली उपेक्षा या विरोधात केंद्र सरकारचा शुक्रवारी नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने निषेध केला. ऐरोली, कोपरखैरणे, बेलापुर येथे राष्ट्रवादीच्यावतीने रेल्वे स्थानकांमध्ये स्वाक्षरी मोहिम घेण्यात आली.
आजपासून ते येत्या १८ जुलैपर्यत ही स्वाक्षरी मोहिम प्रत्येक रेल्वे स्थानकात सुरु राहणार आहे. त्यानंतर या स्वाक्षर्यांचे निवेदन रेल्वे मंत्र्यांना देणार असल्याची माहिती माजी खासदार संजीव नाईक यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.आ.संदीप नाईक, त्याचबरोबर नवी मुंबई रेल्वे प्रवासी महासंघाचे प्रमुख दिनेश पारख व पदाधिकारी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नवी मुंबईतील नगरसेवक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
ऐरोली रेल्वे स्थानकात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने झालेल्या स्वाक्षरी मोहिमेला आ.संदीप नाईक यांनी उपस्थिती दर्शविली होती.मोदी सरकारने केलेली रेल्वे प्रवासी भाड्यातील वाढ ही जाचक असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने त्या विरोधात आंदोलन सुरु करुन सरकारच्या भूमिकेचा निषेध केला आहे.कोपरखैरणे आणि सीबीडी बेलापूर येथे देखील स्वाक्षरी मोहिम
राबविण्यात आली.या तिन्ही ठिकाणी रेल्वे प्रवाशांनी पहिल्याच दिवशी मोठया संख्येने स्वाक्षरी करुन मोदी सरकारच्या दृटप्पी भूमिकेचा निषेध केला आहे.
याविषयी बोलताना संजीव नाईक म्हणाले की, मोदी सरकारने सत्तेवर येण्यापुर्वी अच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखविले होते. सत्तेवर आल्यानंतर अवघ्या १५ दिवसात रेल्वे प्रवासी भाडयात वाढ करुन सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.अर्थ संकल्पात रेल्वे मंत्री नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी ज्यादा रेल्वे सेवा, महिला विशेष सेवा, वातानुकुलित रेल्वे सेवा त्याच बरोबर प्रवासी भाडयात केलेली दरवाढ कमी करतील अशी अपेक्षा होती.मात्र रेल्वे मंत्र्यांनी दैनंदिन १ लाख प्रवास करणार्या नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी कोणतीही तरतूद न करता त्यांची घोर निराशा केली आहे. सरकारच्या या भुमिकेचा राष्ट्रवादीने प्रवाशांची स्वाक्षरी मोहिम घेऊन निषेध केला असल्याचे नाईक म्हणाले. या मोहिमे अंतर्गत केलेल्या सह्यांची प्रत आपण स्वत: रेल्वे मंत्री, रेल्वे बोर्डाचे मुख्य प्रबंधक, विभागीय व्यवस्थापक यांना देणार असल्याचेही नाईक म्हणाले. रेल्वे प्रवाशांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन देखील नाईक यांनी यावेळी केले.