सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : खारघर टोलनाक्यातून श्रेणी ४६ आणि ०६ च्या वाहनांना सूट मिळाली पाहिजे, ही मागणी घेऊन आंदोलन करणार्या आ. प्रशांत ठाकूर यांना मुख्यमंत्र्यांनी आज येथील बैठकीत स्पष्ट केले की, स्थानिकांना टोल अव्यवहार्य आहेच, पण वाशीनंतर आता सगळाच टोलनाका रद्द करण्याबाबत विचार करावा लागेलफ मुख्यमंत्र्यांच्या या संकेतामुळे आ. प्रशांत ठाकूर यांच्या आंदोलनामुळे केवळ पनवेल विभागाचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर बसणारा हा टोल रद्द होणार आहे.
खारघर टोलनाक्यावर स्थानिकांना टोल लावणे पूर्णपणे अव्यवहार्य आहे ही गोष्ट मला मान्य आहे, परंतु संपूर्ण खारघर टोलनाका उचलण्याबाबत निर्णय करायचा असेल, तर ठेकेदाराची आर्थिक प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मी समिती नेमतो, त्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूरही असतील. ही समिती एक महिन्याच्या आत निर्णय करेल. हा निर्णय कॅबिनेटकडे मंजुरीसाठी येईल आणि त्यानंतर खारघर टोलनाक्याचा निर्णय जाहीर केला जाईलफ एवढ्या स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज आमदार प्रशांत ठाकूर आणि रामशेठ ठाकूर यांनी काल केलेल्या आंदोलनानंतर सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
११ जुलै रोजी स्थानिकांना खारघर टोलनाक्यातून सूट द्याफ या मागणीसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी टोलनाका रद्द करण्यासाठी प्रचंड आंदोलन केले होते. रामशेठ ठाकूर यांनी तर रस्त्यावरच झोपून या आंदोलनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. या आंदोलनामुळे सायन-पनवेल महामार्ग दोन तास जाम झाला होता. प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी फोनवरून मुख्यमंत्र्यांना आंदोलनाच्या परिणामाची संभाव्य कल्पना दिल्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने १२ जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृहात बैठक लावली.
या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव सहारिया यांनाही आमंत्रित केले होते. याखेरीज अर्थखात्याचे सचिव श्री. श्रीवास्तव, बांधकाम खात्याचे सचिव श्री. नाईक आणि एमएमआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. देवधर यांनाही आमंत्रित केले होते. यासोबतच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आर. सी. घरत, इंटकचे अध्यक्ष महेंद्र घरत, तालुका अध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भीमसेन माळी यांच्यासह पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कडू आणि गणेश कोळी, संजय कदम आदी पत्रकारही हजर होते.
सकाळी अतिथीगृहात बैठक सुरू होतानाच आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन सादर करून खारघर येथील प्रस्तावित टोलनाक्यासंदर्भात आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन काळजीपूर्वक वाचले आणि त्यानंतर अधिकार्यांना त्यांनी सांगितले की याबाबत आपणास काय सांगायचे आहेफ. बांधकाम सचिव नाईक यांनी शासकीय बाजू स्पष्ट करताना सांगितले की, हा टोलनाका एक महिन्यापूर्वीच ठेकेदाराने पूर्ण करायचा होता, परंतु त्याने तो पूर्ण केले नाही म्हणून ठेकेदाराला दंड आकारण्यात आलेला आहे. शिवाय दोन पुलांची कामे पूर्ण व्हायची आहेत. साधारतः अजून दोन महिने तरी हा टोलनाका सुरू होऊ शकणार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुन्हा विचारले की, दोन महिने अजून होणार नाही ना? मग ठीक आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशांत ठाकूर यांच्याकडे वळून त्यांची भूमिका मांडायला सांगितली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, सुरुवातीलाच मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आहे. कारण त्यांनी पनवेलच्या विकासाकरिता एमएमआरडीएमार्फत १६१ कोटी रुपये आम्हाला दिलेले आहेत.
खारघर टोलनाक्याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करताना प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, या मार्गावरील कळंबोली, कामोठे, कोपरा ही गावे टोलनाक्याच्या हद्दीत ८०० मीटर, कामोठे १.६ किलोमीटर, तर कळंबोली ३.६ किलोमीटर अंतरावर आहे आणि इथून वाशी टोलनाका १८ किलोमीटरवर आहे. पनवेल-मुंबई रस्त्यावर जाण्या-येण्याकरिता स्थानिक लोकांना मुलांना शाळेत सोडणे-आणणे, रुग्णालयात जाणे, डॉक्टरकडे जाणे-येणे, पोलीस कचेरीत जाणे अशा प्रत्येक वेळी सामान्य नागरिकांना टोलचा भुर्दंड कशाकरिता भरावा लागणार आहे? आणि याउलट ठाणे तालुक्यातील नेरूळ, सीवूड, शिरवली, जुईनगर, सानपाडा, तुर्भे, वाशी, वाशीनगर यांना कोकणभवनपासूनचे अंतर १२ ते १३ किलोमीटर असताना टोल भरावा लागणार नाही. नियोजन करताना हा सगळाच घोळ झालेला आहे आणि म्हणून स्थानिक लोकांना एमएच ४६फ आणि एमएच ०६फ या श्रेणीतील सर्व वाहनांना टोलमाफी मिळायलाच हवी.
पालकमंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्र्यांपुढे निवेदन करताना अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितले की, रामशेठ आणि प्रशांत ठाकूर यांच्या विभागातील स्थानिक लोकांना म्हणजेच आमच्याच विभागातील स्थानिक लोकांना टोल देण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. प्रशांत ठाकूर यांची मागणी शंभर टक्के बरोबर आहे. मी मुख्यमंत्र्यांना असे सुचवतो आहे की स्थानिक टोलचा विषय बाजूला ठेवा वाशीला टोल भरल्यानंतर पुन्हा पुण्याच्या रस्त्यावर खालापूरजवळ टोल भरायचा आहे आणि म्हणून खारघरचा टोलनाका पूर्णतः चुकीचा आहे. यासाठी जो झालेला बाराशे कोटींचा खर्च आहे तो खर्च ठेकेदाराला कसा परत करायचा आणि संपूर्ण मार्गावर टोलमुक्ती करायची, याचा निर्णय तुमच्या नेतृत्वाखाली होऊ द्या. त्याचा महाराष्ट्रात एक चांगला संदेश जाईल, शिवाय या टोलमुळे रस्तारुंदीकरण झाल्यावरही वाहतुकीची कमालीची कोंडी होणार आहे आणि म्हणून हा संपूर्ण टोलनाकाच रद्द करण्याची भूमिका आपण घेऊ या.
श्री. रामशेठ ठाकूर यांनी सुचवले की, ‘गणेश नाईक यांची भूमिका बरोबर आहे, पण किमान स्थानिकांना सवलत मिळालीच पाहिजे.
बैठकीतील प्रमुख नेत्यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, या ठिकाणी दोन भूमिका आहेत. स्थानिक लोकांना हा टोल चुकीचा आहे याबद्दल दुमत नाहीच, पण पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितल्याप्रमाणे ठेकदाराच्या रकमेचा परतावा करून, संपूर्ण टोलनाकाच रद्द करणे या विषयाचा निर्णय एका दिवसात करता येणार नाही. कारण बाराशे कोटी रुपयांशी हा विषय संबंधित आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मी समिती नेमतो. त्यात अर्थ सचिव, बांधकाम सचिव, एमएमआरडीसीचे कार्यकारी संचालक, आमदार प्रशांत ठाकूर हे राहातील. हा परतावा कसा करायचा याचा निर्णय आम्ही करू.