केंेंद्रीय रेेल्वे मंत्री सदानंद गौडा यांचे डॉॅ.संजीव नाईक यांना अभिवचन
नवी मुंबई : केंद्रात नवे सरकार आल्यानंतर मांडलेल्या पहिल्याच रेल्वे अर्थ संकल्पात ठाणे लोकसभा मतदार संघातील रेल्वे प्रवाशांच्या मागील काही वर्षापासूनच्या मागण्यांची पुर्तता झालेली नाही. येथील प्रवाशांना न्याय मिळावा यासाठी ठाणे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार संजीव नाईक यांनी नुकतिच केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन विविध मागण्या व प्रलंबित प्रश्नांचे लेखी निवेदन त्यांना दिले. त्यावेळी रेल्वे मंत्री गौडा यांनी महाराष्ट्राला न्याय न मिळाल्याबद्ल खंत व्यक्त करीत येत्या अधिवेशनात ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदरकरांचे प्रश्न मांडून त्याची सोडवणूक करण्याचे अभिवचन नाईक यांना दिले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने १० जुलै २०१४ रोजी नवी दिल्लीत रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेतली. यंदा सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटयाला निराशाच आल्याने महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वेमार्गांची आणि रेल्वेसंबंधित विविध मागण्यांची तात्काळ दखल घेण्यात यावी यासाठी खा.सुप्रिया सुळे यांच्या समवेत संजीव नाईक, खा.विजयसिंह मोहिते-पाटील, खा.धनंजय महाडिक, खा.राजीव सातव यांनी रेल्वे मंत्र्यांना भेटले. खासदारांनी आपल्या मतदारसंघासह महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांवर निवेदन देऊन चर्चा केली.
ठाणे रेल्वे स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्थानक बनविण्यासाठी नाईक यांनी खासदारकीच्या ५ वर्षाच्या कार्यकाळात सातत्याने यशस्वी पाठपुरावा केला आहे.त्यानुसार ठाणे रेल्वे स्थानकात विविध सुविधांची देखील पुर्तता झाली आहे. तत्कालीन रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल, माजी रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी ठाणे रेल्वे स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्थानक बनविण्यासाठी मंजुरी दिली आहे. परंतु या अर्थ संकल्पात त्याबाबतचे कोणतेही सूतोवाच न झाल्याने भविष्यात ठाणे रेल्वे स्थानकातील वाढता प्रवाशांचा भार पाहता त्याचे काय परिणाम होतील याची माहिती नाईक यांनी रेल्वे मंत्री गौडा यांना दिली. ठाणे रेल्वे स्थानकातील पुर्वेकडील कोपरीच्या दिशेने नवीन सॅटीस पुलाची उभारणी करणे, ठाणे रेल्वे स्थानकाला पर्याय म्हणून मनोरुग्णालयाच्या जागेत रेल्वे स्थानक उभारणे, ठाणे हे सर्वात जुने आणि सर्वाधिक प्रवासी ठिकाण असल्याने या स्थानकात लांब पल्याच्या गाडयांसह सर्वच गाडयांना थांबा देणे, ठाणे, मीरा, भाईंदर आणि ठाणे-वाशी-पनवेल हार्बर मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकावर एटिव्हीएम आणि एव्हीएम मशिन तात्काळ उपलब्ध करुन देणे, हार्बर मार्गावरील महत्वपुर्ण अशा दिघा आणि खैरणे बोनकोडे रेल्वे स्थानकाच्या निर्मिती प्रकीयेला गती देणे, सर्व लोकल गाडया डीसी टू एसी करणे, ठाणे-वाशी-पनवेल मार्गावरील रेल्वे स्थानके १५ डब्याची करणे, पनवेल-चौक-कर्जत मार्गाचे दुपदरीकरण करणे, मीरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानकात वाढती गर्दी लक्षात घेता सरकते जीने बसविणे, पश्चिम रेल्वेच्या भाईंदर व मीरारोड रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची वाढविण्यास निधी देणे, ठाणे, मीरारोड, भाईंदर रेल्वे स्थानकात शौचालयासाठी मागील कालावधीत मंजूर झालेला निधी त्वरीत उपलब्ध करुन देणे, कल्याण-दिघा-ऐरोली मार्गे वाशी व पनवेलकडे जाणार्या नव्या मार्गीकेच्या कामाला गती देऊन त्याचे काम युध्द पातळीवर सुरु करणे. हार्बर मार्गावर महिलांसाठी विशेष रेल्वेच्या संख्येत वाढ करणे, सुरक्षेविषयक यंत्रणा सर्वच स्थानकांमध्ये कार्यान्वित करणे अशा विविध मागण्यावर संजीव नाईक यांनी लेखी निवेदन देऊन चर्चा केली.
रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी पुढच्या अधिवेशनात या मागण्यांवर सकारात्मक विचार करू असे सांगितले नाईक यांना सांगितले. महाराष्ट्राच्या संबंधित विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी, महाराष्ट्राला रेल्वेकडून अधिकाधिक सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.अशी ग्वाही यांनी शिष्ट मंडळाला रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी दिली.