* पालकमंत्री ना. गणेेश नाईक यांची पालिका प्रशासनासह संबधीत सर्व घटकांना अंतिम मुदत
नवी मुंबई : पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून आणि महापालिकेच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर-१५ येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यात येत आहे. या लोकाभिमुख आणि शहराला भूषणावह ठरणार्या वास्तूची उभारणी करण्यात काही तांत्रिक बाबींमुळे विलंब होतो आहे. ही वस्तुस्थिती आहे. या भवनाचे काम करणारा ठेकेदार आणि पालिका अधिकार्यांसह सर्व संबंधित घटकांनी या प्रकल्पाच्या उभारणीचे काम युध्द पातळीवर हाती घेऊन डॉ.आंबेडकर महापरिनिर्वाणदिन म्हणजेच ६ डिसेंबर २०१४ पयर्ंत ते पूर्ण करण्याचे सक्त निर्देश पालकमंत्री ना.गणेश नाईक यांनी दिले आहेत.
नवी मुंबईसाठी प्रेरणादायी अशा या स्मारकाच्या कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही ना.नाईक यांनी दिला आहे.
पालकमंत्री ना.नाईक यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी माजी खासदार संजीव नाईक, आ.संदीप नाईक, महापौर सागर नाईक, स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृह नेते अनंत सुतार, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आबासाहेब जर्हाड, शहर अभियंता मोहन डगांवकर, कार्यकारी अभियंता हरिश चिचारीया, उपअभियंता जयंत कांबळे, त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
स्मारकाची सुनियोजितपणे उभारणी व्हावी यासाठी पालकमंत्री ना.नाईक सातत्याने प्रयत्नशील आहेत. तर संजीव नाईक आणि स्थानिक आमदार संदीप नाईक यांनी देखील अनेकदा यासंबंधी बैठका घेतल्या आहेत. तसेच पाहणी दौरा करुन बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आहे.
ना. नाईक यांनी भवनाच्या बांधकामाची पालिका अधिकार्यांकडून सविस्तर माहिती घेतली. आ.संदीप नाईक यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून न्याय भवनामध्ये साकारणार्या अद्ययावत ग्रंथालय आसनव्यवस्था आणि सभामंडपाच्या कामाची देखील माहिती जाणून घेतली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उभारणीसाठी सिडकोकडील जमीन हस्तांतरण करुन घेण्यापासून ते बांधकाम स्थळाचे जुने आरक्षण बदलण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाची परवानगी घेण्यापर्यंतची महत्वाची कामे नामदार नाईक यांच्याच पुढाकाराने मार्गी लागली आहेत. ज्या भुखंडावर भवनाचे काम सुरु आहे त्यावर पूर्वी मैदानाचे आरक्षण होते. पालकमंत्री ना. नाईक यांनी हे आरक्षण बदलण्यासाठी मंत्रालयात बैठका घेतल्या. तसेच राज्य मंत्रीमंडळासमोर हा विषय मांडून आरक्षणात बदल केल्याने या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला.
स्मारक उभारताना काही तांत्रिक अडचणी आल्या असतील परंतु चांगले काम करत असताना त्या कामाचे नियोजन असणे गरजेचे असल्याचे मत ना. नाईक यांनी व्यक्त केले. स्मारकाचे काम पूर्ण करुन येत्या ६ डिसेंबर २०१४ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी या स्मारकाचे लोकार्पण करण्याकरिता सर्व संबधीत घटकांनी तत्पर रहावे, असे नामदार नाईक म्हणाले. न्याय भवनाच्या बांधकामाचा दैनंदिन आढावा बांधकाम ठेकेदाराने माझयासह आ.संदीप नाईक, महापौर सागर नाईक, तसेच पालिका आयुक्त जर्हाड यांना सादर करावा, अशी सूचना नामदार नाईक यांनी शहर अभियंता डगांवकर यांना केली. पालकमंत्री म्हणून प्रत्येक महिन्याला आपण या वास्तूच्या कामाचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करुन आढावा घेणार असल्याचे ना.नाईक म्हणाले.
नवीन पालिका मुख्यालयाच्या रुपाने नवी मुंबई शहरासाठी गौरवास्पद अशी वास्तू निर्माण झाली आहे. ऐरोलीत डॉ.आंबेडकर सामाजिक न्याय भवन आणि वाशी येथे एक्झिबिशन सेंटर साकारत आहे. मात्र अशा विकास कामांमध्ये संबधीत सर्व घटकांकडून दिरंगाई होत असेल तर कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही नामदार नाईक यांनी दिला. तसेच स्मारकाच्या कामाची गुणवत्ता राखा, असे निर्देशही त्यांनी दिले.