नवी मुंबई : सारसोळे ग्रामस्थांना आणि नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवण्याचा नवी मुंबई महापालिका प्रशासनाने गेल्या पावणे पाच वर्षापासून विडाच उचललेला उघडपणे पहावयास मिळत आहे. सारसोळेच्या जेटीवर कोळी लोकांची जाळी जाळणे, जाळी चोरून नेणे, होड्या बुडविणे असे प्रकार रात्रीच्या अंधारात घडत असतानाही आणि ग्रामस्थांकडून जेटीवर हायमस्ट बसविण्याबाबत सातत्याने मागणी होत असतानाही नवी मुंबई महापालिका प्रशासन समस्येकडून कानाडोळा करून ग्रामस्थांच्या जेटीवरील हायमस्टविषयक मागणीला सातत्याने केराची टोपली दाखविली जात आहे.
पामबीच मार्गाला लागूनच सारसोळेची जेटी आहे. भरती-ओहोटीचे गणित सांभाळूनच दिवसाउजेडी तसेच रात्री-अपरात्री सारसोळेेचे ग्रामस्थ मासेमारीसाठी जात असतात. पामबीच मार्गावर पथदिपांचा व अन्य दिव्यांचा प्रकाश असला तरी सारसोळेच्या जेटीवर मात्र सांयकाळनंतर दुसर्या दिवशी उजेडापर्यत काळाकुट्ट अंधारच असतो. २२ डिसेंबर २०१२च्या मध्यरात्री सारसोळेच्या जेटीवर असणारी कोळी लोकांची १४ जाळी अज्ञात समाजकठंकानी जाळली. जाळी जाळणारे अद्यापि सापडलेले नाही. स्थानिक कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष व नेरूळ तालुका कॉंग्रेसचे चिटणिस मनोज मेहेर यांनी पोलिस आयुक्तांकडे तसेच जनता दरबारात हा मुद्दा उपस्थित करूनही काहीही कार्यवाही झालेली आहे.
जेटीवर रात्रीच्या अंधारात समाजविघातक शक्तिचा खुलेआमपणे वावर होत आहे. त्यातच जाळी जाळण्याच्या घटनेपाठोपाठ जेटीवरील जाळी चोरीला जाण्याच्या तसेच जेटीवर उभ्या असलेल्या बोटी बुडविण्याच्या घटनाही घडल्या आहेत. सारसोळेचे ग्रामस्थांना अंधारामध्ये जेटीवर वावरताना एका वेगळ्याच दहशतीखाली वावरावे लागत असल्याची माहिती मनोज मेहेर यांनी दिली. अंधारात जाळी जाळणे, जाळी चोरणे, बोटी बुडविणे अशी कामे होत असल्याने पामबीच मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेर्याला काहीही टिपता येत नाही. सारसोळेच्या जेटीवर महापालिकेच्या माध्यमातून हायमस्ट बसविण्यात यावा यासाठी मनोज मेहेर यांनी महापौर, उपमहापौर, आयुक्त, सहशहर अभियंता यांच्यासह जनता दरबारात पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्याकडे सातत्याने असंख्य वेळा लेखी तक्रारी केल्या आहेत.
सारसोळेच्या जेटीवर हायमस्ट बसविण्याबाबत पालिकेच्या चालढकलपणाबाबत सारसोळेच्या ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सारसोळेच्या यात्रेला ऐरोलीचे आमदार संदीप नाईक कोलवाणी माता मित्र मंडळाच्या कार्यालयात आले असता ग्रामस्थांनी जेटीवरील हायमस्टची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. जेटीवर प्रचंड मोठी दुर्घटना झाल्याशिवाय पालिका प्रशासनाचे आणि पालिकेतील सत्ताधार्यांचे डोळे उघडणार नसल्याची संतप्त प्रतिक्रिया मनोज मेहेर यांनी व्यक्त केली आहे.