सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- अडीच महिन्यावर येवून ठेपलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभा लढविण्यासाठी प्रकल्पग्रस्त व स्थानिक ग्रामस्थ मंडळींचाच अधिक भरणा असल्याचे पहावयास मिळत आहे.
सध्या ऐरोली व बेलापुर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व राज्याच्या विधानसभेत प्रकल्पग्रस्तच करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा म्हणून ओळखले जाणारे संदीप नाईक हे ऐरोलीचे प्रतिनिधीत्व करत आहेत तर बेलापूर विधानसभेचे प्रतिनिधीत्व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक हेच करत आहेत.
बेलापुरच्या जागेबाबत महायुतीमध्ये तळ्यात मळ्यात असले तरी भाजपा ही जागा लढविण्याची शक्यता अधिक वर्तविली जात आहे. बेलापूर मतदारसंघात शिवसेनेची ताकद भाजपापेक्षा अधिक असल्याने स्थानिक शिवसेना पदाधिकारी हा मतदारसंघ शिवसेनेच्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेनेच्या इच्छूकांमध्ये मात्र विजय नाहटा, मनोहर गायखे, विजय माने, विठ्ठल मोरे या नावांची चर्चा असली तरी यापैकी कोणीही प्रकल्पग्रस्त अथवा स्थानिक ग्रामस्थ म्हणून मोडत नाही. नवी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या व शिवसेना नगरसेविका सौ. सरोज रोहीदास पाटील यांच्याही नावाची अधूनमधून चर्चा होत असून त्यामात्र प्रकल्पग्रस्त आहेत.
भाजपाकडून बेलापूर मतदारसंघ सौ.मंदा म्हात्रेच लढविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सौ. मंदा म्हात्रे या स्थानिक ग्रामस्थ असून आक्रमक रणरागिनी अशी त्यांची राजकीय प्रतिमा आहे. नवी मुंबई महापालिकेच्या प्रथम सभागृहात नगरसेविका म्हणून पाऊल ठेवल्यानंतर प्रदेश अध्यक्षा, विधानपरिषद आमदार असा त्यांचा राजकीय क्रम चढताच राहीला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही बेलापूर विधानसभेकरीता मनविसे सांस्कृतिक विभागाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आणि शिरवणे गावचे युवा ग्रामस्थ विवेक सुतार यांनी पक्षाकडे इच्छूक म्हणून उमेदवारी मागितली आहे.
आघाडीचा धर्म असल्याने राष्ट्रवादीच्या कोट्यात ही जागा गेल्यामुळे कॉंग्रेसला ही जागा लढविता येत नाही. गतविधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसचे नवी मुंबईतील मातब्बर नेते नामदेव भगत यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना १३ हजाराच्या आसपास मते मिळविली होती. सध्या कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणिस, सिडको संचालक व नगरसेवक म्हणून कार्यरत असणारे नामदेव भगत हे अखेरच्या क्षणापर्यत काय भूमिका घेतात, याकडे सर्वाचेच लक्ष राहणार आहे. नेरूळस्थित आगरी-कोळी भवन ही नामदेव भगत यांच्या कार्याचा एक पैलू मानला जात आहे.
ऐरोली मतदारसंघात शिवसेनेच्या इच्छूकांमध्ये जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि युवा सेनेचे नवी मुंबईप्रमुख वैभव नाईक ही दोन नावे चर्चिली जात असून वैभव नाईक हे ग्रामस्थ आहेत. भाजपा या ठिकाणी निवडणूक लढविणार नसल्याचे महायुतीमुळे स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेसकडे या मतदारसंघात रमाकांत म्हात्रे हे स्थानिक मातब्बर प्रकल्पग्रस्त नेतृत्व उपलब्ध आहे. ऐरोलीच्या जागेसाठी मनसेकडून इच्छूक म्हणून मढवीनामक एका स्थानिक ग्रामस्थाने उमेदवारी मागितली आहे.