नवी मुंबई : नेरूळमधील प्रभाग ८० मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. सुरेखा रविंद्र इथापे यांच्या प्रयत्नाने उरण फाटा येथे निवारा शेड, प्रभागातील पदपथ दुरूस्तीची कामे व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर सागर नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक रविंद्र इथापे यांनी प्रभागातील कामकाजाचा आढावा घेताना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक व महापौर सागर नाईक यांचे आभार मानले. या कामाबरोबर नेरूळ (पूर्व)मधील सर्वात मोठ्या ११ कोटीच्या नाल्याचे काम, सेक्टर १९/ए च्या जलकुंभासभोवतालच्या उद्यानाचे टप्पा-२ चे काम मंजूर केल्याबद्दल आभार मानले. भिमाशंकर सोसायटीच्या बाहेर उरण फाट्यावर लहान मुलांना शाळेत सोडावे लागते. त्यावेळी पालकांनादेखील उन्हात व पावसात उभे राहावे लागते. त्यासाठी निवारा शेडचे काम होणे गरजेचे होते. त्याचे उद्घाटन आज होत आहे याचा मला आनंद होत आहे. तसेच प्रभागातील पदपथ दुरूस्तीच्या कामाची सुरूवात, सोसायटीच्या दिशादर्शक फलकाचे उद्घाटन तसेच अलकानंद सोसायटी ते सफल सोसायटीपर्यत आतील बाजूस पावसाळी गटाराचे कामदेखील महापौरांच्या हस्ते झाले, याचादेखील आपणास आनंद होत असल्याचे इथापे यांनी सांगितले.
यावेळी महापौर सागर नाईक यांनी सांगितले की, रविंद्र इथापे हे गेल्या २० वर्षापासून महानगरपालिकेत वावरत आहेत. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्यासारखा दुसरा कोणी नगरसेवक पाठपुरावा करत असेल असे मला वाटत नाही. कारण गेल्या अनेक वर्षापासून नाला एके नाला असे सारखे जिथे भेटले तिथे ते काम करण्यास सांगायचे व शेवटी नाला व टेकडीवरील गॉर्डन त्यांनी मंजूर करून घेतले. आज या ठिकाणी निवारा शेड असेल किंवा अनेक विविध नागरी विकास कामाची भूमीपुजने असतील किंवा गृहनिर्माण सोसायटीच्या दिशादशक फलकांची अनावरण असतील ही सर्व नागरीकांच्या सोयीची कामे रविंद्र इथापे आणि सौ. सुरेखा इथापे यांनी मार्गी लावल्याचा मला अभिमान वाटतो. आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनदेखील महापौर सागर नाईक यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविंद्र हांडे, उत्तम काळे, प्रविण जैन, जयवंत दातखिळे, डी.जी.पाटील, रंगराव पाटील, अंबादास तरवडे, अंकुश चव्हाण यांनी मेहनत घेतली.