* वनसंवर्धन दिनानिमित्त ‘ग्रीन होप’च्या वतीने वृक्षारोपण
* गवळीदेव आणि सुलाईदेवी परिसराच्या सुशोभिकरणासाठी २.८४ कोटींचा निधी मंजूर
* आमदार निधीतून १० लाख रुपये निधी
सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : शहरात गवळीदेव, सुलाईदेवी, मुंबादेवी यासारखी पर्यटनस्थळे आहेत. परंतु या पर्यटनस्थळांना हवी तशी ख्याती मिळाली नाही. म्हणून येथील पर्यटनस्थळांचा जागतिक स्तरावर विकास करणार असल्याची ग्वाही आ. संदीप नाईक यांनी दिली आहे. गवळी देव आणि सुलाईदेवी परिसराच्या विकासाकरीता नवी मुंबई महापालिकेकडून २ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. गवळी देव परिसराच्या विकासासाठी ५ लाख रु. आणि सुलाई देवी परिसराच्या विकासासाठी ५ लाख रुपये आमदार निधीतून देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
ग्रीन होप संस्थेच्या वतीने रबाळे एमआयडीसीतील सुलाईदेवी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. वृक्ष संवर्धन दिन साजरा करण्याच्या उद्देशाने आ.नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एफ. जी. नाईक महाविद्यालयातील एनएसएसचे विद्यार्थी व ग्रीन होपच्या संयुक्त विद्यमाने सुलाई देवी परिसरात जवळपास १०० झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी व इतर मान्यवरांनी साग, आंबा इत्यादी जातींची झाडे लावली.
याप्रसंगी पुढे बोलताना आ. नाईक म्हणाले की, पर्यटनस्थळांचा विकास करताना पानथळी जागी, विविध ठिकाणी बसण्याची व्यवस्था तसेच डोंगरापर्यंत (मंदीरापर्यंत) जाण्या-येण्यासाठी पायर्या, सुलभ शौचालय, दिवा-बत्तीची सोय अशा विविध कामांसाठी २.८४ कोटींचा आर्थिक निधी वापरण्यात येणार आहे. आ. नाईक म्हणाले, वृक्ष लागवड ही काळाजी गरज असून प्रत्येक व्यक्तींने एकतरी झाड लावले पाहिजे. नवी मुंबई शहरातील सुलाई देवी मंदीर हे आगरी-कोळी बांधवांचे श्रध्दास्थान असून अनेक नागरिक या ठिकाणी येत असतात. या स्थळाचा विकास व्हावा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती व्हावी याकरीता अनेक झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या परिसराची निगा कशा प्रकारे चांगली ठेवावी, झाडे जास्तीत जास्त कशी लावावी याकरीता गोठीवली गावाचे रहिवासी दादू पाटील यांनी जवळपास १५ वर्षे मेहनत घेतली आहे.
नगरसेवक बाळकृष्ण पाटील, समाजसेवक चंदू वाघरे, युवक अध्यक्ष जयेश कोंडे, समाजसेवक गणेश दादू पाटील, ज्येष्ठ नागरिक दादू पाटील, ललित सकट, एफ. जी. नाईक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रताप महाडीक, तसेच एनएसएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण दिनानिमित्त आ. नाईक यांनी सर्वांना शुभेच्छा देताना सांगितले की, नवी मुंबइत गवळीदेव, मुंबादेवी, सुलाईदेवी या पर्यटनस्थळांच्या सुशोभिकरणााचे काम हे लवकरच सुरु करण्यात येईल. शिवाय विविध औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येईल.