नवी मुंबई : विरोधी पक्ष नेत्या सरोज पाटील यांनी कोपरखैरणे येथील नमुंमपाच्या शिक्षण मंडळाच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी पाटील यांनी पालिकेच्या शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश, बूट व इतर तत्सम साहित्य मिळाले नसल्याची तक्रार शिक्षण अधिकारी इस्माईल हरूर यांच्याकडे केली.
शहरातील कोणताही मुलगा व मुलगी शिक्षणापासून वंचित रहावू नये यासाठी सर्व शिक्षण अभियानातर्गत पालिकेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप केले जाते. परंतु, शाळा सुरु होऊन एक महिना उलटला तरीही, विद्यार्थ्यांना शिक्षण विभागामार्फत बहुतांश विद्यार्थ्यांना गणवेश व बुट मिळालेले नाही. त्यामुळे विद्यर्थी विनाबूट शाळेत जाताना दिसतात.
पालिकेच्या विद्यार्थ्यांची सदर कैफियत सरोज पाटील यांनी मांडली. यावर लवकरच तोडगा काढून सर्व विद्यार्थ्यांना गणवेष, बुट व इतर शालेय वस्तू लवकरच देण्यात येणार असल्याचे शिक्षण अधिकारी इस्माईल हरूर यांनी ग्वाही दिली. तसेच, आग्रोळी गावातील शाळा क्र. ३ च्या समस्यांचेही निराकरण करण्यासाठी लवकरच भेट देणार असल्याचे सांगितले.