नवी मुंबई : लोकसभा निवडणूकीत वापरण्यात आलेला ‘सोशल मिडीया’चा फंडा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूकीअगोदरही नवी मुंबईच्या राजकारणात वापरला जावू लागला आहे. सव्वा दोन-अडीच महिन्यावर येवून ठेपलेला विधानसभा निवडणूकीचे राजकीय वातावरण ‘सोशल मिडीया’मध्ये रंगू लागले. फेसबुक, व्हॉटस्अपवरून राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते परस्परांना भिडू लागल्याने विधानसभा निवडणूकांच्या प्रचाराचा जणू काही सोशल मिडीयावर नारळच फोडला जावू लागल्याचे ठळकपणे पहावयास मिळत आहे.
नवी मुंबई शहरामध्ये ऐरोली व बेलापूर या दोन मतदारसंघांचा समावेश होत असून या दोन्ही ठिकाणी सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच आमदार आहे. नवी मुंबई महापालिकेमध्येही राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे. गेल्या काही वर्षापासून नवी मुंबई ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची राजकीय मक्तेदारी असल्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात बोलले जायचे. पण लोकसभा निवडणूकीनंतर नवी मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होवू लागला आहे. लोकसभा निवडणूकीत तब्बल ४७ हजारापेक्षा अधिक मतांनी राष्ट्रवादी कॉंंग्र्रेसला नवी मुंबईतच पिछाडीवर जावे लागल्याने विरोधकांच्या आक्रमकतेला कमालीची धार येवू लागली आहे.
देशातील अन्य भागांप्रमाणेच गेल्या चार-पाच वर्षात नवी मुंबईची तरूणाई पूर्णपणे सोशल मिडीयाच्या आहारी गेली आहे. फेसबुक आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून तरूणाईचा कल उघडपणे समजू लागला आहे. लोकसभा निवडणूकीच्या प्रचारतंत्रामध्ये भाजपाने पर्यायाने मोदी समर्थकांनी सोशल मिडीयच्या मदतीने केलेली जनजागृती पाहिल्यावर हाच फंडा आता अन्य पक्षीयांकडूनही वापरला जावू लागला आहे.
सुरूवातीच्या काळात नवी मुंबईच्या राजकीय क्षेत्राचा सोशल मिडीयातील आढावा घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रथम क्रमांकावर होती. लोकसभा निवडणूकीअगोदर मनसे वगळता अन्य पक्षीयांनी सोशल मिडीयाला फारसे गांभीर्याने घेतले नव्हते.पण लोकसभा निवडणूकीमध्ये नमोच्या लाटेला सोशल मिडीयाचा लागलेला हातभार पाहील्यावर अन्य पक्षीयांना सोशल मिडीयाचे महत्व आणि उपद्रवमूल्य समजून उमजून आले.
लोकसभा निवडणूकीअगोदर सोशल मिडीयावर आक्रमक असलेली नवी मुंबई मनसे पक्षांतर्गत मतभेदामुळे पिछाडीवर गेली आणि मनसेची जागा शिवसेनेने भरून काढली. लोकसभा निवडणूकीनंतर सोशल मिडीयामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेले पहावयास मिळत आहे. एकेकाळी सोशल मिडीयाकडे गांभीर्याने न पाहणार्या राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही गेल्या तीन महिन्यापासून सोशल मिडीयाचा सक्रिय वापर करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तुलनेत राज्यातील त्यांचा सहकारी पक्ष असलेला कॉंग्रेस तितकासा सोशल मिडीयामध्ये फारसे स्वारस्य दाखविताना दिसत नाही. जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, रविंद्र सावंत, मनोज मेहेर यांचा अपवाद वगळता कॉंग्रेसमध्ये फारसा कोणी सोशल मिडीयाचा गंभीरपणे वापर करताना पहावयास मिळत नाही.फेसबुकच्या आधारावर नेरूळ नोडमध्ये कॉंग्र्रेसचा नावलौकीक वाढविताना मनोज मेहेर यांनी घातलेला राजकीय धुमाकुळ पाहता त्यांना नवी मुंबईच्या राजकारणात ‘फेसबुकचा माफिया’ अशी उपाधी अन्य पक्षीयांकडून प्राप्त झाली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्र्रसमधील नेरूळ आणि घणसोलीकरांकडून जितकी आक्रमकपणे सोशल मिडीयावर पक्षाची बाजू मांडली जात आहे. तितकी त्यांना अन्य भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घटकांकडून फारशी साथ मिळत नसल्याचे पहावयास मिळत आहे.
सोशल मिडीयाचा सध्या नवी मुंबईतील शिवसेनेकडून पूरेपूर वापर केला जात असून ऐरोली ते बेलापूरपर्यत सर्वच शिवसेना सोशल मिडीयात आपले सक्रिय योगदान देत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्र्रेस, कॉंग्रेस, मनसे ज्या प्रमाणात सोशल मिडीयात व्यस्तता दाखवून तरूणाईला आकर्षित करत आहे, त्या तुलनेत नवी मुंबई भाजपाची सोशल मिडीयामध्ये फारशी उल्लेखनीय कामगिरी पहावयास मिळत नाही. ज्या भाजपाने देशाला सोशल मिडीयाच्या मदतीने लोकसभा निवडणूका जिंकता येतात, त्या भाजपाचा मात्र नवी मुंबईतील सोशल मिडीयात फारसा आक्रमक सहभाग नसावा ही दुर्देवाची बाब म्हणावी लागेल. मंदाताई म्हात्रेंच्यारूपाने नवी मुंबई भाजपाचे गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयामध्ये भाजपाचे अस्तित्व दिसू लागले आहे.
राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते फेसबुक व व्हाट्सअपच्या माध्यमातून आपल्या पक्षाची प्रतिमा उजळविताना अन्य पक्षाची प्रतिमा जनसामान्यांमध्ये मलिन कशी होईल याची काळजी घेताना पहावयास मिळत आहे. वर्तमानपत्रातील बातम्यांच्या कात्रणाचाही आधार घेतला जात आहे. विधानसभा निवडणूकीमधील कोणत्याही पक्षाचे उमेदवार महाराष्ट्रात अद्यापि निश्चित झालेले नसताना बेलापूर मतदारसंघातून मनविसे सांस्कृतिक विभागाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विवेक सुतार यांनी तिकीट आपल्याच मिळणार हे गृहीत धरून सोशल मिडीयाच्या माध्यमातून गेल्या महिन्याभरात आपला आक्रमकपणे प्रचार सुरू केल्याने ‘बुवाच बेलापूरचा आमदार’ अशी चर्चा नवी मुंबईच्या सोशल मिडीयामध्ये रंगू लागली आहे. मनविसेचा बुवा कोणा याचे आकर्षण नवी मुंबईतील तरूणांमध्येही चर्चेचा विषय बनू लागला आहे.