नवी मुंबई :- सायन-पनवेल महामार्गावरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत निद्रीस्त राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरूवार, दि. ३१ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) तुर्भे येथील कार्यालयावर ‘हॉर्न वाजवा’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली.
नवी मुंबई शहरातून जाणार्या सायन-पनवेल महामार्गाची वाशी ते गाव ते बेलापूरदरम्यानच्या रस्त्याची पाहणी केल्यावर हे शहरातील रस्ते आहेत का एकाद्या ग्रामीण, अविकसित भागातील रस्ते असल्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे सांगत गजानन काळे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
खड्डेमय रस्त्यामुळे खारघर सोडल्यावर नवी मुंबई सुरू झाल्याचा वाहनचालकांना आणि वाहनातील प्रवाशांना समजते आणि वाशी गाव सोडून खाडीपुलावर गेल्यावर नवी मुंबई शहर सोडल्याचे कळते, ही बाब या शहराला भूषणावह नाही. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालकांना विविध व्याधींचा सामना करत उपचारासाठी डॉक्टरांकडे आणि वाहनांना देखभालीसाठी गॅरेजमध्ये हेलपाटे मारावे लागतात. आजच्या काळात अन्न, वस्त्र, निवार्याइतकीच चांगले रस्ते ही जीवनावश्यक बाब बनली आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात सायन-पनवेल महामार्गावरील नवी मुंबई शहराच्या हद्दीतील नेहमीच खराब असल्याने ही नित्याचीच बाब गृहीत धरून शासनाचा पीडब्ल्यूडी विभाग उदासिनता बाळगत आहे. पीडब्ल्यूडीच्या अधिकार्यांना जाब विचारण्यासाठी मनसेच्या वतीने तुर्भे येथील कार्यालयावर ‘हॉर्न वाजवा’ या धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गजानन काळे यांनी दिली.