सुजित शिंदे
नवी मुंबई : नवी मुंबईच्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अन्य राजकारणी आणि नवी मुंबईकरदेखील फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे पक्षस्थापनेपासून पहावयास मिळत आहे. महापालिकेच्या तिसर्या सार्वत्रिक निवडणूकीत मनसेने ६० जागा लढविल्या आणि मनसेचा दणदणीत पराभव झाला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत नवी मुंबईतून मनसेला फारसा जनाधार नसल्याचे मतपेटीतून स्पष्ट झाले आहे.
ठाण्यात झालेल्या आढावा बैठकीनंतर ऐरोलीच्या तुलनेत बेलापूर मतदारसंघात तिकीट मिळविण्यासाठी मनसेमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे. मनसेला जनाधार नसतानाही तिकीट मिळविण्यासाठी निर्माण झालेली स्पर्धा पाहिल्यावर हा अट्टहास कशासाठी अशी उपहासात्मक चर्चा नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. बेलापूर विधानसभा लढविण्यासाठी हाजी शाहनवाझ खान, विवेक सुतार, मागील उमेदवार राजेंद्र महाले,विनोद पार्टे, आरती धुमाळ यांनी पक्षाकडे इच्छूक म्हणून उमेदवारी मागितली होती. आढावा बैठकीत आलेल्या आमदारांनी शहरअध्यक्ष गजानन काळे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी आर्थिक कारण पुढे करत आपली अडचण स्पष्ट केली आहे. त्यातच मनविसेचे नवी मुंबई अध्यक्ष शिरीष पाटीलदेखील तिकीटच्या स्पर्धेत उतरल्याने चुरस आणखीनच वाढली आहे.
लोकसभा निवडणूकीत मनसेच्या मतदानाचा घसरलेला टक्का पाहता नवी मुंबईतील स्थानिक ग्रामस्थांची मतदारसंख्या पाहता प्रकल्पग्रस्तातील युवा नेतृत्व विवेक सुतारदेखील तिकीटीसाठी प्रबळ दावेदार ठरले आहेत. मनसेच्या स्थापनेपासून पक्षसंघटनेतील त्यांचा सहभाग ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. स्थानिक ग्रामस्थ, पक्षाशी निष्ठावंत, निवडणूकीत पैसा खर्च करण्याची क्षमता, समस्यांची जाण, गावागावातील ग्रामस्थांचा जनाधार या पार्श्वभूमीवर मनसेसुप्रिमो राज ठाकरे हे विवेक सुतार यांचा उमेदवारीसाठी नक्कीच विचार करतील असा आशावाद बेलापूर पट्टीतील ग्रामस्थांकडून आळविला जावू लागला आहे.
ऐरोली मतदारसंघाच्या तुलनेत बेलापूर विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मनसे स्थापनेपासून हाजी शाहनवाझ खान पक्षात सक्रिय असून पक्षाचे उपविभाग अध्यक्ष, वाहतूक सेना त्यानंतर आता मनसेचे नवी मुंबई जनहित अध्यक्ष असा हाजी शाहनवाझ खान यांचा संघटनात्मक प्रवास राहीला आहे.शाहनवाझ खान यांनीही बेलापूर मतदारसंघातून पक्षाकडे इच्छूक म्हणुन तिकीट मागितले असून वाशीमध्ये त्यांनी स्वबळावर कोणाकडेही निधीसंकलन न करता मनसे जनहितचे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय उघडले आहे. मतदारसंघातील मुस्लिम मतदारांची संख्या, पक्षस्थापनेपासून नवी मुंबईत पक्षसंघटनेत काम करणारा एकमेव युवा मुस्लिम चेहरा या पार्श्वभूमी मुस्लिम जनाधार वळविण्यासाठी मनसेसुप्रिमो राज ठाकरे हे शाहनवाझ खानच्या नावावर उमेदवारीचा प्रयोग खेळण्याची शक्यता मनसे वर्तुळात दबक्या आवाजात व्यक्त केली जात आहे.
तिकीट वाटपाच्या स्पर्धेतील गजानन काळे हे प्रबळ नाव. तथापि लोकसभा निवडणूका मनसेने नवी मुंबईत गजानन काळेंच्याच नेतृत्वाखाली लढविल्या असल्याने मतपेटीतील जनाधार पाहता आणि निवडणूक लढविण्यासाठी लागणार्या आर्थिक ताकदीमागील अडचण या बाबी काळेंसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. गजानन काळेंनाच मनसेची उमेदवारी मिळणार असे आढावा बैठकीपूर्वी मनसे वर्तुळात वातावरण असतानाच आढावा बैठकीत राजेंद्र महाले, हाजी शाहनवाझ खान, विवेक सुतार यांनी इच्छूक म्हणून तिकीटवर दावा केल्याने काळेंच्या निवडणूक लढविण्यातील अडचणी आधीच वाढीस लागल्या आहेत.
मनसे नवी मुंबई कार्यक्षेत्रात गटबाजीसाठी सुरूवातीपासूनच प्रसिध्द आहे. त्यातच आता काळेंना मानणार्या गटामध्ये फाटाफूट झालेली उघडपणे पहावयास मिळत आहे. नाराजांची समजूत काढण्यास काळेंच्या शिष्टाईला सफलता येत असली तरी नाराजी किती दूर झाली याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.मनसेमध्ये बेलापूरमध्ये तिकीटवाटपासाठी निर्माण झालेली चुरस आणि हाजी शाहनवाझ खान, विवेक सुतार या इच्छूकांची निर्माण झालेली हवा पाहिल्यावर अन्य पक्षांच्या तुलनेत मनसेतच अधिक राजकीय कलगीतुरा निर्माण झाल्याचे उघडपणे पहावयास मिळत आहे.