ऐरोली / दिपक देशमुख
घणसोली गावात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण हल्ली दिवसें दिवस वाढतच आहेत. तसेच गावातील विद्युत वाहिन्याही जुन्याच असल्याने त्याही बर्याचदा तुटून पडण्याच्या घटना अधूनमधून घडतच आहेत. गेल्या वर्षी गावातील दगडू पाटील चौकाजवळ उभ्या असलेल्या दोन मुलींच्या अंगावर विद्युत वाहिनीच्या ठिणग्या अंगावर पडल्याने भाजल्याची घटना घडली होती. तसेच एका घटनेत एका गायीला आपला प्राण गमवावा लागला होता. असाच एक प्रकार मंगळवारी घणसोली गावात घडल्याने एका कुत्र्याला जीव गमवावा लागला व तेथूनच जात असलेली एक लहान मुलगी जीव मुठीत घेऊन पळाल्याने सुदैवाने वाचली अन्यथा तिलाही आपला जीव गमवावा लागला असता.
या गंभीर घटनेची दखल घेऊन कॉंग्रेस पक्षाच्या स्थानिक कार्यसम्राट नगरसेविका सौ. शोभा दीपक पाटील यांनी गावातील स्थानिक महिला शिष्टमंडळासह विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता थोरात यांची भेट घेऊन घडलेल्या घटनेविषयी तीव्र निषेध व्यक्त करीत २१ व्या शतकातील आधुनिक तंत्र ज्ञानाच्या सुनियोजन शहराचा दर्जा असलेल्या घणसोली गावाला ही शोभनीय बाब नाही अशी खंत व्यक्त करून हल्ली खेड्या-पाड्यातही असे प्रकार अशा घटना घडत नाहीत. मग घणसोलीसारख्या गावातच कशा घडतात? या प्रकाराला आळा कधी बसणार? घणसोलीवासियांनी किती दिवस जीव मुठीत ठेवून वावरायचे ? असे खडे सवाल केले. हा छळवाद, ही कुचंबणा थांबवून त्वरीत पुढील उपाय योजना अमलात आणण्याविषयी निवेदन दिले. सदर गोष्टीची दखल पुढील कारवाई लवकरात लवकर न केल्यास कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी सौ. सुनिता गणेश पाटील, सौ. अंजली भालेराव, सौ. नीता पाटील, सौ. सोनाली पाटील, सौ. धोंडी. सौ. प्रभा शेट्टी , सौ. संगीता शिंदे आदि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.