नवी मुंबई : सोशल मिडीया सामाजिक कार्यात काय करू शकतो याची आज दिवसभरात नवी मुंबईमध्ये प्रचिती पहावयास मिळाली. मायनी गावावर कोसळलेला दु:खाचा डोंगर सावरण्यासाठी देशभरातून मदतीची हाक आली असून नवी मुंबईतील एका ‘बेलापूर विधानसभा-नवी मुंबई’ या व्हॉट्स ग्रुपनेही दिवसभरात एक लाख रूपये जमा केले आहे. शनिवारपर्यत हे संकलन केले जाणार असून सोमवारी ही रक्कम तेथील स्थानिक ग्रामस्थांकरीता प्रशासनाला दिली जाणार असल्याची माहिती ग्रुपचे सदस्य रविंद्र भगत यांनी दिली.
सोशल मिडीयामध्ये सर्वपक्षीयांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी यासाठी ‘बेलापूर विधानसभा-नवी मुंबई’ या ग्रुपची व्हॉट्सअपवर स्थापना झाली. सर्व पक्षातील रथी-महारथीचा या ग्रुपमध्ये समावेश असून दररोज कधी मित्रत्वाचे तर कधी टोकाचे राजकीय वाद या ग्रुपवर होतच असतात. माळीणच्या दुर्घटनेनंतर या गावाला मदत करण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रविंद्र भगत यांनी ग्रुपवर टाकत इतरांचा अभिप्राय मागत दोन हजार रूपयांची स्वत:कडून मदत जाहीर केली. शिवसेनेच्या युवा सेनेचे निखिल मांडवे यांनी दहा हजार रूपये, सारसोळे गावातील संदीप नाईक जनकल्याणकारी सामाजिक संस्थेकडून पन्नास हजार रूपये, युवा सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष वैभव नाईक यांनी दहा हजार रूपये, कॉंग्रेसचे मनोज मेहेर यांनी पाच हजार रूपये, नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडे यांनी पाच हजार रूपये, शिवसेनेचे युवा नेतृत्व सोमनाथ वास्कर यांनी पाच हजार रूपये, मनसेचे नवी मुंबईतील मुस्लिम नेतृत्व आणि मनसे जनहितचे नवी मुंबई अध्यक्ष हाजी शाहनवाझ खान यांनी पाच हजार ५५५ रूपये, मनसेचे विलास चव्हाण यांनी १हजार १११ रूपये, अमोल जाधव यांनी १ हजार रूपये, राजकारणातील अन्य एका दिग्गज चळवळ्या सदस्यांने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर पाच हजार रूपये मदत जाहीर केली आहे. दिवसभरात केवळ कोणाकडेही न जाता व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ही लाख रूपयांची मदत संकलित झाली असून शनिवारपर्यत ग्रुपमध्येच मदत संकलित केली जाणार आहे. सोमवारी ग्रुपमधील काही सदस्य माळीण गावात जावून तेथील ग्रामस्थांशी चर्चा करून ही रक्कम त्यांच्या मदतीसाठी देणार असल्याचे रविंद्र भगत यांनी सांगितले.
व्हॉटसअपवरील ग्रुप हा चावडी गप्पा मारण्यासाठीच नसतो तर सामाजिक कार्यासाठीही उपयुक्त असतो हे नवी मुंबईतील ‘बेलापूर विधानसभा-नवी मुंबई’ या ग्रुपने दाखवून दिले आहे. सर्वपक्षीय सदस्यांनी राजकीय मतभेद विसरून आपल्या ग्रुपकरीता संकलनात पुढाकार घेतला, हे विशेष मानावे लागेल.