मनसे शहर अध्यक्ष गजानन काळेंचा इशारा
नवी मुंबई :- सायन-पनवेल महामार्गावरील नवी मुंबई हद्दीतील खड्डे लवकरात लवकर न बुजविल्यास महाराष्ट्र शासनाचे या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीने या रस्त्यावरील खड्ड्यात पीडब्ल्यूडीच्या अधिकार्यांना व संबंधित ठेकेदारांना खड्ड्यात आणून बसविण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष गजानन काळे यांनी दिला.
नवी मुंबई कार्यक्षेत्रात सायन-पनवेल महामार्गावर पडलेल्या खड्डयांबाबत मनसेच्या वतीने गुरूवारी सकाळी ११ वाजता पीडब्ल्यूडीच्या तुर्भे येथील कार्यालयावर ‘हॉर्न वाजवा’ या धडक आंदोलनाचे शहर अध्यक्ष गजानन काळेंच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते. संततधार पाऊसातही मनसेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासमोर पीडब्ल्यूडीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या छोटेखानी भाषणात गजानन काळे यांनी हा इशारा दिला.
नवी मुंबईतील अन्य पक्षसंघटना विधानसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी धावपळ करत असताना मनसेच्यावतीने जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे सांगून गजानन काळे पुढे म्हणाले की, सायन-पनवेल महामार्गावर नवी मुंबई हद्दीत २२१ खड्डे असून या रस्त्याचे १२५० कोटी रूपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्ड्यावरून ये-जा करताना काय यातना सहन होतात याची जाणिव वाहनचालक आणि त्यातून जाणार्या प्रवाशांनाच माहिती आहे. नवी मुंबईसारख्या शहरात महामार्गावरील खड्डे ही लाजिरवाणी आणि संतापजनक बाब आहे. हे खड्डे न बुजविल्यास समस्येच्या गांभीर्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्या खड्ड्यातच पीडब्ल्यूडीच्या अधिकार्यांना व संबंधित ठेकेदारांनाही बसविण्यास नवी मुंबई मनसे मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा गजानन काळे यांनी यावेळी दिला.
यावेळी मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे, विनोद पार्टे, आरती धुमाळ यांच्यासह अन्य मनसे पदाधिकार्यांचीही समयोचित भाषणे झाली. त्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात जावून अधिकार्यांना निवेदन सादर केले. मुसळधार पाऊसातही मनसे कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि हॉर्नचा आवाज यापुढे वरूणराजाचा आक्रोशही काही प्रमाणात शिथील झाला होता.
या मोर्चात गजानन काळेसमवेत मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे, ऍड. कौस्तुभ मोरे, शहर उपाध्यक्ष विनोद पार्टे, धीरज भोईर, गजानन खबाले, निलेश बाणखिले, सचिव दत्तात्रय सुर्यवंशी, रवींद्र वालावलकर, विभाग अध्यक्ष उमेश ठाकूर, रूपेश कदम, मनसेचे शाखाध्यक्ष विठ्ठल गावडे, बाबाजी गोडसे, पप्पीभाई पिल्ले, दिनेश गवळी, मनविसे सांस्कृतिकचे ठाणे जिल्हाध्यक्ष अमर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विवेक सुतार, नवी मुंबई अध्यक्ष गिरीराज दरेकर, शहर सचिव गणेश पालवे, उपशहर अध्यक्ष योगेश शेटे, भूषण बारवे यांच्यासह डॉ. आरती धुमाळ, अनिता नायडू, गायत्री शिंदे, तृप्ती साळूंके, शीला जाधव, शर्मिला भांडूगळे आदी सहभागी झाले होते.