* सुरुवातीच्या ३ तासात ७००० अर्जांची विक्री
नवी मुंबई : स्वप्नपूर्ती या सिडकोच्या अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटाच्या गृहप्रकल्पाच्या अर्जांच्या विक्रिस शुक्रवारी प्रारंभ होताच सुरूवातीच्या ३ तासात ७००० अर्जांची विक्री झाली. सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया आणि संचालक नामदेव भगत यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतील रायगड भवन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी केशव वरखेडकर, एम. डी. लेले, टी. एल. परब, अनिल अग्रवाल, निलेश तांडेल, जे. टी. पाटील, नरेंद्र हिरे, गोपाल गांगल आणि अनिल दिघे उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगीच इच्छुक अर्जदारांनी घटनास्थळी लांबच लांब रांग लावली होती. अर्जदारांचा हा प्रतिसाद पाहता व्यासपिठावरील सर्वच मान्यवरांनी सामान्य नागरिकांची गरज लक्षात घेऊन सिडको यापुढे अत्यल्प उत्पन्न व अल्प उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न गटासाठी अधिकाधिक घरे बांधिल अशी ग्वाही दिली. सर्वांसाठी निवारा हा सिडकोचा नारा असून तो प्रत्यक्षात उतरवण्यात सिडको कटिबद्ध आहे असे उद्गार प्रमोद हिंदुराव यांनी यावेळी काढले. रिक्षाचालक तसेच घरकाम करणार्या महिला यांनाही हक्काचे घर मिळावे यासाठी छोट्या आकाराची घरे बांधण्याचा सिडकोचा विचार असून गृहनिर्माण प्रकल्पांवरती सिडकोने किमान हजार कोटी रूपये खर्च करावेत अशी सुचना त्यांनी यावेळी केली.
प्रत्येक वर्षी सुमारे सात हजार घरे अत्यल्प तसेच अल्प उत्पन्न गटासाठी बांधण्याची सिडकोने योजना आखली होती. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांची निवार्याची गरज पूर्ण करण्याकरिता सिडको यापुढे प्रतिवर्षी दहा हजार घरे बांधेल, अशी घोषणा संजय भाटिया यांनी यावेळी केली. सिडकोने बिल्डरांना जमिनी विकल्या नाहीत. बिल्डरांनी प्रकल्पग्रस्तांच्या १२.५% च्या भूखंडांवरती इमारती बांधल्या आहेत आणि या घरांच्या किंमती वारेमाप वाढवून ठेवल्या आहेत. त्या तुलनेने स्वस्त आणि तरीही उत्तम बांधकाम दर्जाची घरे सिडकोने दिली आहेत आणि यापुढेही देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पाचे अर्ज विकत घेण्यासाठी सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन तसेच रायगड भवन येथे रांगा लावू नयेत, त्यांना हे अर्ज त्यांच्या नजिकच्या ठाणे जनता सहकारी बँकेच्या (टीजेएसबी) तसेच क्सिस बँकेच्या शाखांमध्येही विकत मिळतील, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता माहिती पुस्तिकांसह अर्ज सकाळी १०.०० ते सायं. ६.०० या वेळेत ५ सप्टेंबर २०१४ पर्यंत नागरिकांसाठी उपलब्ध राहतील.
प्रथम येणार्यास प्राधान्य या तत्वावर अर्जाची विक्री करण्यात येणार नाही त्यामुळे अर्ज प्रत्येक इच्छुक नागरिकांस उपलब्ध होईल, असेही सिडकोने स्पष्ट केले आहे. प्राप्त झालेल्या अर्जातून सर्व संवर्गासाठी असलेल्या घरांच्या सोडती काढल्यानंतर यशस्वी अर्जदारांना वाटपपत्र पाठविण्यात येतील. अत्यल्प उत्पन्न गटाच्या घराची किंमत रू. १५,७८,३०० इतकी आहे, तर अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या घराची किंमत रू. २३,९३,००० एवढी आहे. या योजनेत ६ समान हप्त्यात घराची सर्व रक्कम भरण्याची मुभा देण्यात आली आहे.
नागरिकांनी आपल्या नजिकच्या बँकेतून अर्ज विकत घेऊन सिडको लिमिटेड’च्या नावे मुंबई अथवा नवी मुंबई येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट किंवा पे ऑर्डर जोडून अर्ज २० सप्टेंबर २०१४ पूर्वी वरील बँकेच्या कुठल्याही शाखेत सादर करावेत. अत्यल्प उत्पन्न गटाच्या घरासाठी इसारा अनामत रक्कम रू. २५,००० तर अल्प उत्पन्न गटासाठी ही रक्कम रू. ५०,००० असेल. अत्यल्प उत्पन्न गटासाठी मासिक उत्पन्न रु. १६,००० पेक्षा कमी तर अल्प उत्पन्न गटासाठी मासिक उत्पन्न रु. १६,००१ ते रु. ४०,००० दरम्यान असावे.
कुरिअर किंवा पोस्टाने पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जदार १५ वर्षांपासून महाराष्ट्राचा रहिवासी असायला हवा आणि अर्जदाराचे स्वत:चे किंवा पत्नीच्या नावावर नवी मुंबईत घर नसावे आणि अवलंबून असलेल्या व्यक्तींचा उल्लेख करणे आवश्यक आहे.