नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघात शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. शिवसेनेच्या नुकत्याच पार पडलेल्या यशस्वी मेळाव्यानंतर शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे रविवारी (दि. ३ ऑगस्ट) ऐरोलीत युवा-युवतीशी संवाद या कार्यक्रमासाठी येत आहेत.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे यांनी आयोजित केलेला रोजगार मेळावा, त्यानंतर शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात यशस्वी पार पडलेला निर्धार मेळावा यामुळे विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर नवी मुंबई शिवसेनेत कमालीचा उत्साह संचारलेला पहावयास मिळत आहे. ३ ऑगस्ट रोजी सांयकाळी ६ वाजता ऐरोली सेक्टर १४ मधील लेवा पाटीदार हॉल येथे शिवसेनेचे नवी मुंबईतील युवा नेते ममित चौगुले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केेलेे आहे.
‘युवा-युवतीशी सुसंवाद’ या कार्यक्रमात युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे थेट उपस्थित युवा वर्गाशी सुसंवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. त्यांना राजकारणात काय अभिप्रेत आहे, ते जाणून घेणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे नवी मुंबई स्तरावरील युवा नेते ममित चौगुले व त्यांचे युवा सहकारी परिश्रम करत आहेत.