नवी मुंबई : शिक्षणामुळेच सर्वांगीण प्रगतीचे अनेक मार्ग खुले होत जातात हे लक्षात घेऊनच नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या स्थापनेपासून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जात असून आज इतर शहरांतील महानगरपालिकेच्या शाळांतील पटसंख्या घटताना दिसत असताना नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये मात्र प्रत्येक वर्षी वाढणारी पटसंख्या तसेच महानगरपालिका शाळांतील मुलांची स्कॉलरशीप, एस.एस.सी. बोर्ड परीक्षेतील टक्केवारी बघितली की हाती घेतलेले शिक्षण व्हिजन यशस्वी होत असल्याचे समाधान वाटते अशा शब्दात महाराष्ट्र राज्याचे उप्तादन शुल्क आणि नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी मनोगत व्यक्त करीत ज्यावेळी पालक मुलांच्या प्रवेशासाठी खाजगी शाळांऐवजी पालिका शाळांना प्राधान्य देतील त्यावेळी शिक्षण व्हिजनची खर्या अर्थाने पुर्तता होईल असे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कातकरीपाडा, राबाडे येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील नवीन इमारतीमधील ७ वाढीव वर्ग खोल्यांच्या व सभागृहाच्या उद् घाटन समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी व्यासपिठावर आमदार संदीप नाईक, शिक्षण मंडळाचे सभापती सुधाकर सोनवणे, स्थानिक नगरसेविका डॉ. गौतमी सोनवणे, नगरसेवक रामआशिष यादव व संपत शेवाळे, नगरसेविका सौ. रंजना सोनवणे व सौ. मोनिका पाटील, शिक्षण विभागाचे उप आयुक्त अमरीश पटनिगीरे, शिक्षणाधिकारी हरुन अत्तार, शिक्षण मंडळाचे माजी सभापती राम विचारे, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, पोलीस निरीक्षक रामचंद्र देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
दहा वर्षांपुर्वी जी जागा पडीक होती त्या जागेचा आज कायापलट झाला असून याठिकाणी नवी मुंबईच्या नावलौकिकात लक्षणीय भर घालणारी शाळा इमारत उभी राहिली. यामध्ये शिक्षण मंडळाचे सभापती श्री. सुधाकर सोनवणे यांच्या झोकून देऊन काम करण्याच्या पद्धतीचा मोठा वाटा असून शिक्षण व्हिजनला अपेक्षित गोष्टींची परीपूर्तता या शाळेमध्ये होते हे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सादर केलेल्या भाषणांमधून व नृत्याविष्कारामधून होत असल्याचे दिसून येते. यादृष्टीने ही शाळा आदर्श असल्याचे मत पालकमंत्री महोदय यांनी व्यक्त केले.
आमदार संदीप नाईक यांनी याप्रसंगी बोलताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारतोय ही निश्चितच आनंदाची गोष्ट असल्याचे सांगत ना.गणेश नाईक यांना अपेक्षित असलेले शिक्षण व्हिजन योग्य प्रकारे राबविण्यात गुरुजनवर्गाचा व पालकांचा मोठा सहभाग असल्याचे स्पष्ट केले.
याप्रसंगी मंत्रीमहोदयांच्या शुभहस्ते इ. ४ थी व ७ वी च्या स्कॉलरशीपमधील गुणवंत विद्यार्थ्यांना व शिक्षकवृंदास सन्मानीत करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील नूतन वास्तूत पहिल्या मजल्यावर २४.७४ मी द १२.२२ मी आकाराचे प्रशस्त व भव्य सभागृह तसेच दुसर्या मजल्यावर ७ मोठ्या आकाराच्या वर्ग खोल्या बांधण्यात आल्या असून वाढती विद्यार्थीसंख्या सामावून घेण्यासाठी वर्ग खोल्यांमध्ये वाढ करावी लागणे हे उत्तम शैक्षणिक वाटचालीचे लक्षण आहे असे अभिप्राय मान्यवरांनी नोंदविले.