* पालकमंत्री ना.गणेश नाईक यांनी दिले निर्देश
* पालिकेच्या आगामी महासभेत ठराव येणार
* सामाजिक न्यायाच्या दिशेन महत्वपूर्ण पाऊल
नवी मुंबई / प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिकेतील विविध आस्थापनांवर कार्यरत असणार्या आणि विविध ठेकेदारांमार्फत पालिकेच्या सेवेत असणार्या सुमारे ९५०० विविध संवर्गातील कामगारांसाठी शुभवर्तमान असून या कामगारांना कायम करण्याचा ठराव पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या निर्देशानुसार ८ ऑगस्ट २०१४ रोजी होणार्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे.
पालकमंत्री नामदार नाईक यांनी सोमवारी पालिकेचे आयुक्त आबासाहेब जर्हाड, महापौर सागर नाईक आणि वरिष्ठ अधिकार्यांसमवेत महत्वाची बैठक घेवून या कामगारांना कायम करण्याची प्रक्रीया सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.
पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी कंत्राटी कामगारांना नेहमीच सामाजिक न्याय प्रदान केला आहे. या कामगारांना समान कामास समान
वेतन मिळवून दिले आहे. पीएफ, बोनस, ग्रॅच्युईटी आदींचा लाभ त्यांना मिळतो आहे. मात्र गेली अनेक वर्षे कार्यरत असूनही हे कामगार कायम झालेले नाहीत. त्यामुळे त्यांना सामाजिक स्थैर्य लाभलेले नाही. साफसफाई, पाणीपुरवठा, मलःनिस्सारण, स्मशानभूमी, डंपिंग ग्राउंड, उद्यान, हिवताप नियंत्रण, मूषक नियंत्रण, कोंडवाडे, परिवहन, रुग्णालये, शिक्षक, बहुउददेशिय कामगार, ठोक मानधनावरील कामगार, मॅकेनिकल व इतर सर्व संवर्गातील कामगारांनी त्यांच्या कामाची गुणवत्ता सिध्द केलेली आहे. सफाई खात्यात २८६०, पाणीपुरवठा खात्यात ४५०, मलनिस्सारण खात्यात २३८, परिवहन उपक्रमांत ९६९, उद्यान विभागात ४१५ इत्यादी सर्व खात्यांत मिळून कंत्राटी कामगारांचा आकडा सुमारे ९५०० आहे. कंत्राटींचा रोजगार वाचला पाहिजे यासाठी ठेकेदार बदलला तरी कामगार बदलता कामा नये हे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांचे कामगारहिताचे धोरण पालिकेने अवलंबले आहे. या कामगारांना कायम करण्याचा अशासकीय ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. त्यावर साधकबाधक चर्चा घडवून आणल्यानंतर तो ठराव मंजूर करुन राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन आणि नगरविकास खात्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. राज्य शासनाकडे हा ठराव आल्यानंतर स्वतः पालकमंत्री नामदार गणेश नाईक हे मंत्रालयीन स्तरावर संबधीत विभागांची बैठक आयोजित करुन या ठरावास मान्यता घेणार आहेत. त्यामुळे या हजारो कामगारांसाठी हा निर्णय ऐतिहासिक असाच ठरणार आहे. हा ठराव मंजूर होईपर्यंत या कामगारांचा बेसिक पगार आणि भत्ते वाढविण्याची सूचना देखील पालकमंत्री नामदार नाईक यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. कंत्राटी कामगारांना कायम करण्याच्या पालिकेच्या ठरावास राज्य शासनाने तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी माजी खासदार आणि नवी मुंबई महापालिकेचे प्रथम महापौर डॉ.संजीव गणेश नाईक यांनी केली आहे. ही मंजुरी न मिळाल्यास प्रसंगी कामगारहितास्तव राज्य शासनाविरोधात जनहित याचिका दाखल करण्याची भूमिका त्यांनी बोलून दाखविली आहे. या कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय म्हणजे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी टाकलेले आणखी एक पाउल असल्याचे बोलले जात आहे.