नवी मुंबई / प्रतिनिधी
दिल्ली येथील महाराष्ट्र सदन मध्ये यावर्षी देखील गणेशोत्सवाची धामधूम होणार आहे. गेली सतरा वर्ष महाराष्ट्र सदनमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. राज्य सरकार त्यासाठी वर्षाला दहा लाखांचे अनुदान देखील देते. मात्र निवासी आयुक्तपदी आलेल्या बिपीन मलिक या अधिकारयाने यंदा गणेशोत्सवासासाठी महाराष्ट्र सदनामध्ये परवानगी नाकारली होती. त्यामुळे शिवसेनेसह तमाम महाराष्ट्रातील गणेशभक्त नाराज झाले होते. आज मंगळवारी लोकसभेत खासदार राजन विचारे यानी शून्य प्रहरात चर्चेच्या वेळी महाराष्ट्र सदनमधील गणेशोत्सवाला नाकारलेल्या परवानगी बद्दलचा मुद्दा चर्चेला घेतला. विधीमंडळात शिवसेनेने उचलेल्या या मुद्दयावर चर्चा झाली.
अखेर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यानी दिल्लीत महाराष्ट्र सदनमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्य शासन सर्व सहकार्य करील असे आश्वासन दिले. दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनात सांस्कृतिक कार्यक्रमाना मज्जाव करण्याचे निवासी आयुक्तांचे धोरण संशयास्पद आहे. गेली सतरा वर्षे तेथील कामगार गणेशोत्सव साजरा करतात आणि अचानक यावर्षी त्याला विरोध कशाला. या गणेशोत्सवात दिल्लीतील सर्व धर्माचे लोक येऊन पूजा करतात. गणेशोत्सवाच्या काळात उत्साहाचे, प्रसन्नतेचे वातावरण सर्वत्र असते, त्यामुळे गणेशोत्सवाची परंपरा खंडीत करण्याचा प्रयत्न कोणी अधिकारी करीत असेल तर, शिवसेना त्याला विरोध करणार. आमची भूमिका आम्ही आधीच स्पष्ट केली आहे. आता मुख्यमंत्र्यानी आश्वासन दिल्याने दिल्लीतही गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार यात शंका नाही, असे मत शिवसेना खासदार राजन विचारे यानी व्यक्त केले.