अवघ्या २४ तासात झाली पदपथाची साफसफाई
नवी मुंबई : संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात राज्यात दोन वेळा प्रथम क्रमाकांचा पुरस्कार मिळविणारी नवी मुंबई महापालिका अस्वच्छतेलाच खतपाणी घालत असल्याचे ठिकठिकाणी पहावयास मिळते.पदपथावर पडलेला कचर्याचा ढिगारा महिनाभर हटविण्यास टाळाटाळ करणार्या महापालिकेला कॉंग्र्रेसच्या नेरूळ तालुका चिटणिस मनोज मेहेर यांनी पदपथावरील कचरा न हलविल्यास पालिका विभाग कार्यालय अधिकार्याच्या दालनात नेवून टाकण्याचा इशारा देताच अवघ्या २४ तासात कचर्याचा ढिगारा हटवून पदपथाची साफसफाई करण्यात आली.
नेरूळ सेक्टर ६ आणि सारसोळे गावचा परिसर पालिका कार्यक्षेत्रात नागरी समस्यांसाठी प्रसिध्दच आहे. त्यातच सारसोळे गावचे स्थानिक युवा ग्रामस्थ आणि कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुका चिटणिस मनोज मेहेर यांनी पालिका, सिडको, पोलीस मुख्यालय ते पालकमंत्र्यांचा जनता दरबार आदी ठिकाणी सातत्याने पत्रव्यवहार करतच राहील्याने हा परिसर प्रशासकीय पातळीवरही गेल्या साडे चार वर्षात चांगलाच नावारूपाला आलेला आहे.
नेरूळ सेक्टर सहामधील प्लॉट १५ वरील शिवम सोसायटीच्या पाठीमागील बाजूस एमएसईबीच्या डीपीच्या प्रवेशद्वारासमोरील पदपथावर गेल्या एक महिन्यापासून कचर्याचा ढिगारा पडला होता. यामध्ये माती, कचरा, तुटलेल्या झाडाच्या फांद्या आदीचा समावेश होता. महिना उलटला तरी पालिका प्रशासनाकडून कचर्याचा ढिगारा हलविण्याची कोणत्याही हालचाली होत नव्हत्या. रस्त्यावरून ये-जा करणार्या स्थानिक रहीवाशांना व वाहनचालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. मनोज मेहेर यांच्याकडे स्थानिक भागातील रहीवाशांनी या समस्येचे निवारण करण्याची गळ घातली. पदपथावरील कचर्याचा ढिगारा हटविण्यासाठी मनोज मेहेर यांनी नेरूळ पालिका विभाग कार्यालयाला लेखी तक्रार करून आठवडा उलटला तरीही कार्यवाही झाली नाही. अखेरीला मनोज मेहेर यांनी संतप्त होत ७२ तासाच्या आत कचर्याचा ढिगारा न हटविल्यास नेरूळ पालिका विभाग अधिकार्याच्या दालनात कचरा आणून टाकण्याचा इशारा दिला. पालिका प्रशासनाला जाग आली आणि अवघ्या २४ तासाच्या आत कचरा हटवून पदपथाची साफसफाई करण्यात आली. कचर्याचा ढिगारा हटल्याने दुर्गंधी जावून पदपथही स्वच्छ झाला आहे. कचर्याचा ढिगारा हटविल्याविषयी स्थानिक रहीवाशांमध्ये मनोज मेहेर यांच्या कार्याविषयी समाधान व्यक्त केले जात आहे. अन्य पक्षीयांची समस्या सोडविण्याची उदासिनता आणि मनोज मेहेर यांची प्रत्येक समस्या सोडविण्याची तत्परता पाहिल्यावर २०१५च्या महापालिका निवडणूकीत या प्रभागाचा निकाल काय लागणार याचे उत्तर आताच पहावयास मिळत आहे.