सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- सारसोळेच्या जेटीवर हायमस्ट नसल्याने स्थानिक ग्रामस्थांना मासेमारीसाठी ये-जा करताना जीव मुठीत ठेवून वावरावे लागत आहे. सारसोळेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने व सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने चालढकल चालविल्याने सारसोळेकरांच्या समस्या निकाली निघाल्या नाहीत. आता सारसोळेकरांना न्याय मिळवून देण्यासाठी व सारसोळेच्या जेटीवरील हायमस्टची समस्या संपुष्ठात आणण्यासाठी आता मनविसेच्या सांस्कृतिक विभागाकडून थेट मंत्रालयीन पातळीवरच पाठपुरावा करणार असल्याची माहिती मनविसे सांस्कृतिकचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विवेक सुतार यांनी दिली.
विवेक सुतार हे गेल्या काही वर्षापासून राजकीय क्षेत्रात सक्रिय असून नवी मुंबईच्या राजकारणात कडवट राजसमर्थक म्हणून ओळखले जात आहेत. विधानसभा निवडणूकीत बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक म्हणून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. प्रकल्पग्रस्त व स्थानिक ग्रामस्थ चेहरा, नवी मुंबईच्या समस्यांची जाण, पैसा खर्च करण्याची क्षमता आणि जनसंपर्क या पार्श्वभूमीवर मनसेच्या गोटात बेलापूरच्या उमेदवारीसाठी विवेक सुतारांचा दावा प्रबळ मानला जात आहे. पक्षाकडे तिकीट मागितल्यापासून बेलापूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामस्थांचा व प्रकल्पग्रस्त संघटनांचा विवेक सुतार यांना समर्थन भेटू लागले आहे. विवेक सुतार यांनी गावागावात भेटी देवून आपली भूमिका स्पष्ट करण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी सांयकाळी सारसोळेच्या जेटीवर भेट देवून विवेक सुतार यांनी सारसोळेच्या ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
सारसोळेच्या जेटीवर अंधारामुळे जेटीवरील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जाळी जाळणे, जाळी चोरीला जाणे, बोटी बुडविणे, जाळी जाळणारे अद्यापि फरार या पार्श्वभूमीवर जेटीवर हायमस्टची गरज असताना महापालिका प्रशासनापासून सर्वांनीच सारसोळेकरांच्या निवेदने, तक्रारपत्रांना केराची टोपली दाखविली असल्याचे आपण जवळून पाहिले आहे. सारसोळेकरांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आता आपण स्वस्थ बसणार नसून हायमस्टकरीता थेट मंत्रालयातच पाठपुरावा करून समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. तसेच हायमस्टसह सारसोळेकरांच्या अन्य समस्या सोडविण्यास कानाडोळा करणार्या संबंधित पालिका अधिकार्यांवर कारवाई करण्याची नगरविकास खात्याकडे मागणी करणार असल्याची माहिती विवेक सुतार यांनी दिली.