योगेश शेटे
नवी मुंबई : नवी मुंबई शिवसेना व शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे तसेच राजा शिवराय प्रबोधन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वाशीत शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात ११७५ युवकांना रोजगार प्राप्त झाला. वाशी सेक्टर ९अ येथील शिव विष्णू सभागृहात भव्य रोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे ऍड. मनोहर गायखेंच्या कार्यप्रणालीची नवी मुंबईत चर्चा होत आहे.
दोन दिवस चाललेल्या या रोजगार मेळाव्यामध्ये नवी मुंबई, पुणे , नाशिक, नगर, मुंबई , ठाणे यातून दहा हजारापेक्षा अधिक बेरोजगार सहभागी झाले होते. रोजगार मेळाव्यासोबत दोन दिवस करिअर मार्गदर्शनाचाही उपक्रम राबविण्यात आला. ज्यामध्ये भवितव्यासाठी काय करावे यासाठी सहभागी शिबिरार्थींना प्रबोधनही करण्यात आले. त्यामध्ये ऍनिमेशन, एविएशन, ऍनिमेशन कॉम्प्युटर तसेच परदेशी नोकर्याबाबत मोठमोठ्या नामाकिंत कंपन्यांचेही स्टॉल या रोजगार मेळाव्यात लावण्यात आले होते. त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शनासाठी या करिअर मार्गदर्शन शिबिरामध्ये सहभागी झाली होती.
भव्य रोजगार मार्गदर्शन मेळावा आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय नाहटा, नवी मुंबईच्या शिवसेना महिला संघठक सौ. रंजना शिंत्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भोलानाथ तुरे, युवा सेनेचे जिल्हाधिकारी वैभव नाईक, नगरसेवक विजयानंद माने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन करताना शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी बेरोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शनासारखा कार्यक्रम राबवून ऍड. मनोहर गायखे यांनी खरोखरीच पुण्याईचे काम केलेेले आहे.अशा लोकोपयोगी कार्यक्रमाचा अधिकाधिक लाभ युवा पिढीने घ्यावा असे आवाहन नाहटा यांनी केले.
रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होवून ज्यांनी आपली व्यक्तिगत माहिती (बायोडाटा) दिली आहे, त्यांचा फालोअप घेवून भविष्यात त्यांना लवकरात लवकर रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयास केला जाणार असल्याची ग्वाही ऍड. मनोहर गायखे यांनी यावेळी दिली.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भोलानाथ तुरे, महाराष्ट्र वितरक सेनेचे नवी मुंबई उपाध्यक्ष हरिश्चंद्र ठाकूर, वाशीचे उपशहरप्रमुख प्रफुल्ल म्हात्रे, किशोर शेवाळे, विद्यार्थी सेनेचे महेश बनकर, भालेकर, उपविभागप्रमुख तुकाराम आंधळे, शाखाप्रमुख कृष्णा सावंत, माजी उपशहरप्रमुख सुरेंद्र मंडलिक, उपशाखाप्रमुख संजय पानसरे आदी मान्यवर हजर होते.