सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : लोकसभा निवडणूकीमध्ये राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दणदणीत पराभव झाला. लोकसभा लढविलेल्या सर्वच ठिकाणी मतदारांनी झिडकारल्याने मनसे उमेदवारांवर आपले ‘डिपॉझिट’ही जप्त होण्याची नामुष्की आली. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर कार्यकर्ते वपदाधिकार्यांमध्ये उत्साहाचे ‘टॉनिक’ देण्याचे काम अन्य पक्षांप्रमाणे सध्या मनसेतही सुरू आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे मनसेचे उमेदवार ठरविण्यासाठी बुधवारी, दि.१६ जुलै रोजी मनसेच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मनसेचे नवी मुंबई शहर सचिव संदीप गलुगडे यांनी दिली.
शुक्रवारी रात्री मनसेचे ठाण्यातील नेते निलेश चव्हाण यांच्या कार्यालयात ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख गिरीश दहाणूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय शहर अध्यक्ष व शहर कार्यकारिणीला कळविण्यात आला. या बैठकीस ठाणे लोकसभा मतदारसंघातील मनसेचे त्या त्या ठिकाणचे शहर अध्यक्ष व शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते.
शुक्रवारी झालेल्या बैठकीत संपर्कप्रमुख गिरीश दहाणूरकर यांनी पदाधिकार्यांशी सुसंवाद साधताना लोकसभा निवडणूकीतील अपयशाने खचून न जाता विधानसभा निवडणूकीत नव्या जोमाने गरूडभरारी घेण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना व पदाधिकार्यांना दिल्या. गटबाजी व महत्वाकांक्षा यापेक्षा पक्षसंघटना मोठी असल्याचे सांगत त्यांनी उपस्थित पदाधिकार्यांना योग्य तो संदेशही दिला.
बुधवार, दि. १६ जुलै रोजी ठाण्यातील गेस्ट हाऊसमध्ये मनसे पदाधिकार्यांची ही आढावा बैठक घेण्यात येत असून ठाणे लोकसभा मतदारसंघात येणार्या सहा विधानसभा मतदारसंघातील इच्छूकांची चाचपणीदेखील या आढावा बैठकीत करण्यात येणार आहे. या आढावा बैठकीत आ.प्रविण दरेकर, आ.प्रकाश भोईर, मनसेचे प्रवक्ते संजय घाडी आणि मनसे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय चित्रेदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसेचे नवी मुंबई शहर सचिव संदीप गलुगडे यांनी दिली.
या बैठकीस मनसेसोबत मनसेचे अन्य सेलचे पदाधिकारीदेखील उपस्थित राहणार आहे. मनसेला लोकसभा निवडणूकीत फारसा जनाधार भेटला नसला तरी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मनसेच्या छावणीत अनेकांची महत्वाकांक्षा आहे. पक्षाच्या आढावा बैठकीत निवडणूक लढविण्यासाठी खरोखरच कोण इच्छूक आहे, हे स्पष्ट होणार आहे.