नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सांस्कृतिक विभागाने नेरूळ सेक्टर १९ ए येथील क्रिस्टल ट्रेड सेंटरला शुक्रवारी ‘लई भारी’ दणका दिला. आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध चित्रपट अभिनेते रितेश देशमुख यांचा ‘लई भारी’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला.त्यामुळे रितेश देशमुखचा हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी नेरूळ सेक्टर १९ ए येथील क्रिस्टल ट्रेड सेंटरच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती.प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर या चित्रपटाच्या तिकिट्स सुद्धा खरेदी केल्या होत्या.परंतु,तांत्रिक अडचणीमुळे चित्रपट गृह प्रशासनाकडून आज लई भारी या मराठी चित्रपटाच्या शो च्या पहिल्याच दिवशी चित्रपट दाखविण्यात आला नाही.त्यामुळे प्रेक्षकांकडून चित्रपट गृहात तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
चित्रपट गृहात लई भारी चित्रपट प्रदर्शित न झाल्याने प्रेक्षकांकामध्ये कमालीची नाराजी पसरली होती.त्यानंतर प्रेक्षकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सांस्कृतिक विभागाचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गिरीराज दरेकर यांच्याकडे तक्रारी केल्या. प्रेक्षकांच्या तक्रारीची तात्काळ दाखल घेत मनविसे सांस्कृतिकचे ठाणे लोकसभा अध्यक्ष अमर पाटील, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष विवेकभाऊ सुतार, नवी मुंबई शहर अध्यक्ष गिरीराज दरेकर यांच्यासोबत नेरूळमधील मनविसे सांस्कृतिक विभागाच्या पदाधिकार्यांनी घटना स्थळी धाव घेतली. त्यानंतर अमर पाटील, विवेक सुतार, गिरीराज दरेकर यांनी चित्रपट गृह प्रशासनाला चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित न केल्यामुळे चांगलेच धारेवर धरले. तसेच चित्रपटाची तिकिटे खरेदी केलेल्या प्रेक्षकांच्या तिकिटांचे पैसे पुन्हा परत करण्यास भाग पाडले. यावेळी मनविसे सांस्कृतिकच्या शिष्टमंडळापुढे नमती भूमिका घेत चित्रपट गृह प्रशासनाने प्रेक्षकांची माफी मागितली. तसेच चित्रपटगृहात हा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचे लेखी आश्वासन चित्रपट गृह प्रशासनाने मनविसेच्या सांस्कृतिकच्या शिष्टमंडळाला दिले.